जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

पुणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात दहा लाख रुपयांपेक्षा मोठय़ा रकमेच्या व्यवहारांची माहिती बँकांनी आयकर विभागाकडे द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीशी संबंधित सर्व विभागांच्या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी या सूचना दिल्या.

ते म्हणाले, की राष्ट्रीयाकृत, शेडय़ुल, तसेच सहकारी बँकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आर्थिक व्यवहार होतील, याकडे लक्ष द्यावे. बँकांनी उमेदवारांची खाती प्राधान्याने उघडावीत. दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाकडे नोंदवावी. मात्र, निवडणूक काळात सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

राजकीय पक्षांनी प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करून घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या खर्चाचे विवरण सादर करावे. आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी-व्हिजिल या मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहिता भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत. विधानसभा निवडणुकीची अंमलबजावणी करताना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी या वेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, बँक आणि रेल्वे विभागांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.