विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर आहे. मात्र, भोसरी मतदार संघातील भाजपाचे उमेदवार महेश लांडगे आमदार झाल्याचे फलक अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून लावण्यात आल्याचे दिसत आहेत. ”महेश लांडगे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..” अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे नागिराकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

महेश लांडगे हे या अगोदर अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर यंदा त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. यंदा भोसरी मतदार संघात महेश लांडगे यांच्याविरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे रिंगणात होते.

विधानसभेची मतदानप्रक्रिया सोमवारी पार पडली असून, उद्या (गुरूवार) निकाल लागणार आहेत. मात्र, या अगोदर महेश लांडगे यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले असल्याचे दिसत आहेत. ”महेश लांडगे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, पर्मनंट आमदार” असा मजकूर असलेले फलक लावण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांच्या उत्साहीपणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.