महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे ‘स्थायी समिती अध्यक्ष’ हे पद राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा बापूराव कर्णे गुरुजी यांना दिले असून, त्यांच्या रूपाने महापालिकेचा एक्केचाळीसशे कोटी रुपयांचा खजिना एका निवृत्त शिक्षकाच्या हाती जाणार आहे. गुरुजींची औपचारिक निवड बुधवारी होईल आणि महापालिका शाळेतील शिक्षक स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्याचे प्रथमच पुणेकरांना पाहायला मिळेल.
स्थायी समितीची निवडणूक बुधवारी होत आहे. युतीतर्फे पृथ्वीराज सुतार आणि काँग्रेस आघाडीतर्फे कर्णे गुरुजी या दोघांचे अर्ज या निवडणुकीसाठी आले आहेत. महापालिकेतील सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये झालेल्या करारानुसार यंदाचे अध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे. सोळा सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये काँग्रेस आघाडीचे नऊ सदस्य आहेत. त्यामुळे गुरुजींची निवड निश्चित मानली जात आहे. कर्णे गुरुजी या वेळी सलग चौथ्यांदा महापालिकेत निवडून आले असून, प्रथम अपक्ष म्हणून नंतर काँग्रेसतर्फे आणि त्यानंतर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते नगरसेवक झाले आहेत.
अकरावी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरुजींनी डी.एड.चे शिक्षण माण तालुक्यातील दहिवडी येथे १९७२ मध्ये पूर्ण केले. या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. नंतर लगेचच त्यांना पुणे महापालिका शिक्षण मंडळात शिक्षकाची नोकरी मिळाली आणि दापोडीच्या शाळेतून कर्णे यांच्या शिक्षकी पेशाचा आरंभ झाला. फुलेनगर, चिखलवाडी येथील शाळांमध्ये काम केल्यानंतर ढोले पाटील शाळेत ते काही वर्षे शिक्षक होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पुणे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी तेरा वर्षे काम केले. शिक्षकी पेशातून निवृत्ती घेऊन १९९७ मध्ये ते राजकारणात आले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवून राजकारणातील पदार्पणातच ते नगरसेवकही झाले.
महापालिकेत गेल्या सतरा वर्षांत विधी समितीचे अध्यक्ष, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आणि प्रभाग समिती अध्यक्ष अशी तीन अध्यक्षपदे गुरुजींकडे आली. या पदांना महापालिकेची गाडी मिळते, पण तिन्ही वेळी गुरुजींनी ही गाडी नाकारली होती. झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना पक्की घरे देण्यासाठीच्या बीएसयूपी या योजनेची अतिशय प्रभावी अंमलबजावणी गुरुजींनी त्यांच्या प्रभागात केली असून या कामाचे कौतुक देशपातळीवर झाले आहे.
 
विद्यार्थिदशेत अतिशय चांगले शिक्षक मला पाहायला मिळाले. त्यांचा संस्कार माझ्यावर झाला. त्यांचा आदर्श ठेवूनच मी शिक्षकी पेशा स्वीकारला. महापालिका शाळेत शिक्षक म्हणून काम करताना सदैव सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काम केले. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न केले. नगरसेवक म्हणूनही सामान्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले. त्यामुळेच नागरिकांनी मला सलग चार वेळा निवडून दिले.
– बापूराव कर्णे गुरुजी