शतकमहोत्सवी पार केलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये गैरप्रकारांना खीळ घालण्यासाठी यंदा बारकोड पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. प्रत्येक मतपत्रिकेला बारकोड लावण्यात येणार असून मतदाराने मतपत्रिकेबरोबर स्वत:च्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रतही जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन मतपत्रिका गोळा करण्याबरोबरच खोटय़ा मतपत्रिकांचा वापर अशा गैरप्रकारांना चाप बसणार आहे. त्याचप्रमाणे पोस्ट कार्यालयामध्ये पोस्ट बॉक्स नंबरचा वापरही करण्यात येणार आहे.
राजकीय निवडणुकीप्रमाणेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्येही वेगवेगळे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येतात. थेट मतदाराच्या घरी जाऊन मतपत्रिका गोळा करण्याचे प्रताप उमेदवारांकडून केले जातात. गोळा केलेल्या मतपत्रिकांच्याआधारे विरोधी पॅनेलमधील उमेदवाराबरोबर मतांचे संगनमत करून विजय संपादन करण्याची कला अनेक उमेदवारांनी आत्मसात केली होती. असे गैरप्रकार घडू नयेत यासाठी बारकोडचा निर्णय घेण्यात आला आहे. परिषदेच्या कार्यकक्षेतील १३ जिल्ह्य़ांच्या मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा ठेवण्यात आला असून त्यावर बारकोड क्रमांकही देण्यात आला आहे. त्यामुळे खोटय़ा मतपत्रिका तयार करून त्याद्वारे मतदान करण्याचे प्रयत्न यंदा बंद होणार आहेत.
परिषदेच्या आजीव सभासदांना शुक्रवारपासून मतपत्रिका पाठविण्यास प्रारंभ झाला असून टप्प्याटप्प्याने सर्व ११ हजार ३३४ मतदारांना मतपत्रिका रवाना करण्यात येणार आहेत. परिषदेकडे येणाऱ्या मतपत्रिका पोस्ट बॉक्सवर मागविण्यात आल्या असून तेथे आलेल्या मतपत्रिकाच मतपेटीमध्ये टाकल्या जातील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली. मतदाराच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत बरोबर जोडलेली नसल्यास मतमोजणीच्या वेळी ती मतपत्रिका ग्राह्य़ धरली जाणार नाही. त्याचप्रमाणे मतपत्रिकांपासून ओळखपत्राची प्रत वेगळी केल्यानंतरच १५ मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे मतदाराचे मतदान हे गुप्तच राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला. १ मार्चपर्यंत मतपत्रिका मिळाली नाही, तर संबंधित मतदाराच्या लेखी मागणीनुसार दुसरी मतपत्रिका पाठविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अॅड. सुभाष किवडे आणि प्रा. सुधाकर जाधवर हे निवडणूक अधिकारी या वेळी उपस्थित होते.

परिषद साहित्याभिमुख करणार
गट-तटाचे राजकारण आणि कट-कारस्थानांचा अड्डा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद हे समीकरण बदलून परिषदेला साहित्याभिमुख आणि समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे परिवर्तन आघाडीचे कार्याध्यक्षपदाचे उमेदवार प्रा. मिलिंद जोशी यांनी शुक्रवारी सांगितले. प्रमुख कार्यवाहपदाचे उमेदवार प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीताराजे भोसले यांच्यासह परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत जोशी यांनी पॅनेलचा जाहीरनामा मांडला. आमच्या पॅनेलमध्ये ३० टक्के जुने आणि ७० टक्के नवे उमेदवार असून त्यामध्ये चार महिला उमेदवारांचा अंतर्भाव केला असल्याचेही त्यांनी सांगितले.