23 July 2019

News Flash

बारामतीच्या खासदार वस्तू वाटपापुरत्याच मर्यादित

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गुरुवारी टीका केली.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यमंत्री विजय शिवतारे यांची टीका

सायकल, काठय़ा, चष्मे, श्रवणयंत्र अशा वस्तू वाटपापुरत्याच बारातमीच्या खासदार मर्यादित राहिल्या आहेत. या प्रकारच्या वस्तू वाटपाला विकास म्हणता येत नाही. अशी कामे मंडळाचे कार्यकर्तेही करतात, अशा शब्दांत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गुरुवारी टीका केली.

शिवतारे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संतापाची लाट आहे, असे सांगून ते म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात विकास केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांना विकास करण्यात अपयश आले आहे. वस्तूंचे वाटप करणे याला विकास म्हणता येत नाही. वास्तविक सुळे यांनी अनेक योजना मतदारसंघात आणण्याची आवश्यकता होती. त्यांना अशी कामे करता आली नाहीत. त्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कालावधीत अजित पवार हे पालकमंत्री होते. मात्र त्यांना जिल्ह्य़ातील प्रश्न मार्गी लावता आले नाहीत. पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाचा प्रश्न युतीच्या काळातच मार्गी लागला.

आदेश दिल्यास निवडणूक लढवीन

बारामती लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जागेबाबत योग्य तो निर्णय घेतील. पक्षाने आदेश दिल्यास बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.

First Published on March 15, 2019 1:58 am

Web Title: baramati mps limited to allocation of goods