गाडी मुक्कामी ठेवण्याची सोय नसल्याने भूर्दंड

पुण्याहून दौंडमार्गे बारामतीला जाण्यासाठी संध्याकाळी रेल्वे गाडीची व्यवस्था असली, तरी बारामती स्थानकावर गाडी मुक्कामी ठेवण्याची व्यवस्था आजवर उभारण्यात न आल्याचा भूर्दंड रेल्वेलाच बसतो आहे. रात्री बारामतीला पोहोचलेली गाडी दौंड स्थानकात आणली जाते. त्यानंतर पहाटे पुन्हा दुसरी गाडी बारामतीला पाठवली जाते. ही गाडी सकाळी बारामतीहून पुण्यासाठी सोडण्यात येते. या सर्व घडामोडींमध्ये गाडय़ा दररोज सुमारे शंभर किलोमीटरचे अंतर विनाप्रवासीच धावतात.

रेल्वेची वाहतूक अत्यंत किचकट असते. त्याचे योग्य नियोजन न झाल्यास त्याची क्लिष्टता आणखी वाढते. त्याचेच एक उदाहरण पुणे- बारामती मार्गावरील देता येईल. पुणे स्थानकावरून दौंडमार्गे बारामतीसाठी संध्याकाळी पावणेसातला गाडी सोडण्यात येते. कर्जत- पुणे शटल पुण्याला आल्यानंतर तिचे विद्युत इंजिन काढून डिझेलचे इंजिन जोडण्यात येते. ही गाडी पुणे-दौंड- बारामतीसाठी पुढे सोडण्यात येते. पुण्यावरून निघाल्यानंतर ही गाडी रात्री साडेआठच्या सुमारास दौंड स्थानकावर पोहोचते. तेथून रात्री दहाच्या सुमारास ती बारामतीला पोहोचते.

बारामतीला रात्री पोहोचलेली शटल मुक्कामी ठेवण्यासाठी बारामती स्थानकावर जागाच नाही. त्यामुळे रात्री शटल मुक्कामासाठी पुन्हा दौंड स्थानकात आणण्यात येते. रात्री दौंडकडे जाण्यासाठी प्रवासी नसतात. त्यामुळे ही फेरी रिकामीच जाते. त्याचप्रमाणे सकाळी सातला बारामतीहून दौंडसाठी गाडी सोडायची असल्याने भल्या पहाटेच दौंडवरून बारामतीमध्ये डेमू गाडी आणली जाते. ही फेरीही रिकामीच ठरते. रिकाम्या फेऱ्यांचा प्रवाशांना लाभ होत नाही. रेल्वेलाही मोठा भरुदड सहन करावा लागत आहे.

दौंड- बारामती सिग्नलच नाही

दौंड ते बारामती या रेल्वे मार्गावर सिग्नलची यंत्रणा अद्याप उभारण्यात आलेली नाही. हा एकेरी मार्ग असल्याने एकावेळी एकच गाडी या दोन स्थानकादरम्यान असते. सिग्नल नसल्याने या दोन स्थानकांमध्ये गाडी नेताना चालकाच्या हातातच सिग्नलचा कंदील दिला जातो. त्यामुळे मधल्या सर्व स्थानकांवर गाडी थांबविण्याबरोबरच अत्यंत सावधपणे या मार्गावरून गाडी पुढे न्यावी लागते. वस्ती असलेल्या भागामध्ये अनेकदा हॉर्न बाजवूनच पुढे जावे लागते. त्यामुळे या मार्गावर आवश्यक सिग्नल यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.

रेल्वेच्या चुकीच्या नियोजनामुळे पुणे- बारामती मार्गावरील रिकाम्या फेऱ्यांतून त्यांनाच फटका बसतो आहे. बारामती स्थानकाच्या दोन्ही बाजूला रेल्वेची जागा आहे. या ठिकाणी २० डब्यांपर्यंतची गाडी उभी राहील असा फलाट होणे आवश्यक आहे. बारामती औद्योगिक पट्टा असल्याने माल वाहतुकीसाठीही मोठा वाव आहे. बारामतीसाठी भविष्याचा विचार करता दोन फलाटांची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी पुणे- कर्जत गाडी दौंडकडे सोडताना विद्युत इंजिनावरच सोडली जावी.

हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा