आजपासून निर्बधांत शिथिलता

बारामती : करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यास बारामतीच्या स्थानिक प्रशासनाला यश आल्याने आणि करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे मंगळवारपासून (८ जून) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सर्व दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने मात्र सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

व्यापारी महासंघाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन व्यापारी वर्गाने काटोकोरपणे करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. सुमारे दोन महिन्यांनी बारामती शहर व परिसरातील दुकाने खुली होत आहेत. राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वारंवार प्रशासनाला व नागरिकांना करोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष सुचना केलेल्या होत्या. त्याचप्रमाणे लसीकरणावर भर देण्यात आल्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत झालेली आहे.

गेली दोन महिने सलग दुकाने बंद असल्याने कामगारांचा पगार, दुकानभाडे, वीजबिल, बँकेचा कर्जहप्ता, व्यापारी देणी आदी थकल्याने व्यापारी अडचणीत सापडला आहे. सध्या दुकाने चार तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी सात तासांची वेळ आहे. त्यामुळे काही प्रमाणात व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.