बारामती/ शिरूर : बारामती तालुक्यातील कण्हेरी, काटेवाडी परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारी आणि वनविभागाला अनेक दिवस गुंगारा देणारी बिबटय़ा मादी पकडण्यात वनविभागाला अखेर यश आले. ग्रामस्थ आणि आपत्कालीन पथकाच्या मदतीने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी बिबटय़ा जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शिरूर तालुक्यातील वाळूकशेत मळा भागात वावर असलेल्या बिबटय़ाही वनविभागाच्या पिंजऱ्यात सापडला आहे.

बारामती तालुक्यातील कण्हेरी येथे संतोष जाधव यांच्या शेतामध्ये पाच कॅमेरे लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे याच भागात तीन पिंजरे ठेवण्यात आले होते. गुरुवारी पहाटे बिबटय़ाची मादी पिंजऱ्यात सापडली, अशी माहिती वनविभागाचे वनपरीक्षेत्र मंडळ अधिकारी त्र्यंबक जराड यांनी दिली. काटेवाडी, कण्हेरी परिसरात सुमारे सोळा ते सतरा जनावरांना बिबटय़ाने ठार केले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती होती. परिसरात सातत्याने बिबटय़ाच्या पायांचे ठसे दिसून येत होते. त्यामुळे बिबटय़ाला जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागापुढे होते. वनरक्षक मीनाक्षी गुरव, संध्या कांबळे, अनिल माने, अमोल पाचपुते यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पहाटे बिबटय़ाच्या मादीला जेरबंद केले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील वाळूकशेत मळा भागातही गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा वावर होता. या भागात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यांच्या साहाय्याने बिबटय़ाला पकडण्यात यश आले आहे. पुणे-नगर रस्त्यावर वाहनाच्या धडकेने बिबटय़ा मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यापाठोपाठ आता एक बिबटय़ा जेरबंद झाल्याने या भागातील बिबटय़ांचा वावर स्पष्ट झाला आहे.