मेळघाट सपोर्ट ग्रूपतर्फे आयोजीत कार्यक्रमात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
‘यापूर्वी २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आत्महत्या झाल्याच. आंदोलने झाली तरीही कर्जमाफी देण्यात येणार नाही, तर पायाभूत सुविधांचा विकास करून प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असे राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मेळघाट सपोर्ट ग्रूपतर्फे ‘संपूर्ण बांबू केंद्राचे’ संस्थापक सुनील आणि निरुपमा देशपांडे यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, या वेळी पाटील बोलत होते. या वेळी विश्वास लोकरे, विलास बर्डे, राजीव सहस्रबुद्धे, प्रमोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात पाटील म्हणाले, ‘‘कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जाते. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली, तरीही कर्जमाफी देण्यात येणार नाही. कर्जमाफी देणे हा दुष्काळ किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील उपाय नाही. पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास शेतकरी आपल्या पायावर उभे राहतील. त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर आम्ही भर देत आहोत.’’
या वेळी झालेल्या देशपांडे दाम्पत्याच्या मुलाखतीतून मेळघाटाचे वास्तव आणि संपूर्ण बांबू केंद्राच्या स्थापनेची गोष्ट उलगडली. ,‘‘चीन हे बांबूच्या उत्पादनात अग्रेसर दिसते. आपण त्यापेक्षा पुढे आहोत. एखादे तंत्र विकसित करताना त्याच्या टिश्यू कल्चरपासून ते बाजारोपयोगी उत्पादनांपर्यंत प्रत्येक टप्प्याचा विचार करून त्याचा शिस्तबद्ध विकास करणे, हे चीनकडून शिकण्यासारखे नक्कीच आहे.’’
‘मेळघाटाचा विकास करताना, आपल्याला योग्य वाटते ते त्यांना दिले जाते. मात्र तेथील लोकांना काय हवे आहे, त्यांची गरज काय आहे हे विचारले जात नाही,’ अशी टिपणीही त्यांनी या वेळी केली.

ग्रामज्ञान विद्यापीठ
मेळघाटातील ३६ गावे मिळून ग्रामज्ञान विद्यापीठाची स्थापन करण्यात येत असल्याची माहिती सुनील देशपांडे यांनी कार्यक्रमात दिली. पारंपरिक व्यवसाय, लोककला आणि कृषी असे विविध विभाग असलेले हे विद्यापीठ गुरुकुल पद्धतीने काम करणार आहे. प्रत्येक कौशल्यासाठी वीस विद्यार्थी आणि या कलेची माहिती देणारे एक संग्रहालय उभारण्यात येणार आहे.