News Flash

जयश्री काळे यांना यंदाचा ‘बाया कर्वे पुरस्कार’ जाहीर

लहान मुले आणि होतकरू महिलांमधील कौशल्ये विकसित करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे काम काळे करत आहेत.

महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या बाया कर्वे पुरस्कारासाठी यंदा जागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करत असलेल्या जयश्री विश्वास काळे यांची निवड करण्यात आली आहे. कर्वे शिक्षण संस्थेतर्फे १९९६ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेची निवड या पुरस्कारासाठी केली जाते.
जयश्री काळे यांनी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले असून त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्येही अधिकारी पदावर त्यांनी काम केले. सामाजिक काम करण्यासाठी त्यांनी १९९८ मध्ये बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. लहान मुले आणि होतकरू महिलांमधील कौशल्ये विकसित करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे आणि महिलांना स्वावलंबी करण्याचे काम काळे तेव्हापासून करत आहेत. या कामासाठी त्यांनी जागृती सेवा संस्थेची स्थापना केली. छोटय़ा महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी संस्थेतर्फे प्रदर्शनांचे व विक्री मेळाव्यांचेही आयोजन केले जाते. गरीब घरातील गरजू मुलींना अभ्यासासाठी निवांत जागा व पोषक वातावरण मिळावे यासाठी मुलींच्या राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था संस्थेतर्फे विनामूल्य केली जाते.
गरीब घरातील मुलींचे शाळागळतीचे प्रमाण कमी होऊन त्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्थेतर्फे गेली दहा वर्षे अभ्यासवर्गाचे आयोजन केले जाते. या उपक्रमात जयश्री काळे बारावीपर्यंतच्या मुलींना स्वत: गणित विषय शिकवतात. तसेच सायंकाळी वस्त्यांमध्ये जाऊन मुलींना विनामूल्य मार्गदर्शन करतात. भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी सात वर्षे काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2015 3:22 am

Web Title: baya karve award to jayashri kale
Next Stories
1 परीक्षा शुल्कातील वीस टक्के फक्त विद्यापीठाच्या नावासाठी
2 आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक
3 नाही, नाही म्हणताना महापौर सभेच्या दिवशीच स्पेन दौऱ्यावर रवाना
Just Now!
X