गणेश मंडपांबरोबरच विसर्जन मिरवणुकीतही विविध प्रकारे विजेशी संपर्क येत असल्याने त्याबाबत सतर्कता न बाळगल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतही वीज यंत्रणेबाबत सतर्कता बाळगणे गरजेची आहे. मंडळांबरोबरच मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. महावितरण कंपनीच्या वतीने विसर्जन मार्गावर तात्पुरता नियंत्रण कक्षही सुरू करण्यात येणार आहे.
गणेश मंडपामध्ये विजेबाबत योग्य दक्षता न घेतल्यास जीवघेणा अपघात होण्याचा धोका असतो. यंदा थेरगाव येथे झालेल्या एका घटनेत गणेश मंडपात विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुण कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गणेश मंडपांबरोबरच विसर्जन मिरवणुकीतही विजेबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी काही वेळेला नागरिकांकडून वीज यंत्रणांचा आधार घेतला जातो. डीपी बॉक्स, फिडर पिलर आदींवर उभे राहून मिरवणूक पाहिली जाते. मात्र, हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, नागरिकांनी हे टाळावे व कोणी तसा प्रयत्न करीत असल्यास संबंधिताला वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर जाण्यास भाग पाडावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांकडून सादर केल्या जाणाऱ्या देखाव्याबाबतही दक्षता घेणे गरजेचे आहे. मिरवणुकीतील वाहने, देखावे आदी उच्च व लघुदाब वाहिन्या तसेच रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणांपासून सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी मंडळांनी घ्यावी.

अडचणी व तक्रारी तातडीने कळवा

विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत वीज यंत्रणेबाबत काही अडचणी व तक्रारी असल्यास किंवा विजेबाबत काही घटनांची माहिती देण्यासाठी नागरिक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चोवीस तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरवरील १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. लक्ष्मी रस्ता व टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रस्ता येथे तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. मिरवणूक संपेपर्यंत या कक्षात सहायक अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे परिमंडलातील गणेश विसर्जनाच्या कालावधीत मोबाइल व्हॅनसह महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे.