हैदराबाद येथील बॉम्बस्फोटानंतर पुण्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्याला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून देशव्यापी संपासाठी लावलेला बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एस. बी. तांबडे यांनी दिली.
हैदराबाद येथील दिलसुखनगर भागात दोन स्फोटानंतर राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. या पाश्र्वभूमीवर पुण्यातही सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तांबडे म्हणाले की, शहरात गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. देशव्यापी संपासाठी पुण्यात बंदोबस्त लावण्यात आला होता. तो बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. नागरिकांनी काही संशयित वस्तू आढळल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यावी, असे अवाहन तांबडे यांनी केले.