News Flash

– मंगल कार्यालये, लॉन चोरटय़ांचे लक्ष्य

शुभमंगल असे गुरुजींनी म्हणताच वऱ्हाडी मंडळींनी ‘सावधान’ होण्याची गरज निर्माण झाली आहे.

विवाह हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील मंगल क्षण. पण, या क्षणामध्येच काही तरी अमंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या लग्नसराईचा मोसम असून कार्यालये आणि लॉनमध्ये झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दागिने आणि रोकड असलेल्या बॅगा आणि पर्स हातोहात फसवून लंपास करीत आहेत. नंतर पस्तावण्यात अर्थ नसल्याने विवाह समारंभात हौसेने लाखमोलाचे ऐवज घेऊन वावरताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शुभमंगल असे गुरुजींनी म्हणताच वऱ्हाडी मंडळींनी ‘सावधान’ होण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून विवाह समारंभ म्हणजे एक ‘इव्हेंट’ झाला आहे. काही वर्षांपूर्वी बंदिस्त सभागृहात विवाह समारंभ पार पडायचे. मात्र, आर्थिक सुबत्ता आल्यानंतर पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरात प्रशस्त लॉनची ही संकल्पना अस्तित्वात आली. ज्या विवाह समारंभाला माणसे मोठय़ा प्रमाणावर येतात, त्या यजमानांसाठी लॉन उपयुक्त आणि सोयीचेही ठरू लागले. अशा समारंभात होणाऱ्या गर्दीमध्ये शिरून महागडे ऐवज ठेवलेल्या पर्स, बॅगा लांबविण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे.
कात्रज परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये मुंबई येथे वास्तव्यास असलेले नीलेश बडदे हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत नातेवाइकांच्या विवाहासाठी नुकतेच आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास बडदे यांची आई कार्यालयामध्ये छायाचित्रासाठी व्यासपीठावर गेल्या. व्यासपीठावर जात असताना त्यांनी सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड असा अडीच लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स खुर्चीवर ठेवली होती. बडदे यांच्या आईचे लक्ष नाही असे ध्यानात येताच ही संधी चोरटय़ाने साधली. त्याने बडदे यांच्या आईची पर्स लांबविली आणि तेथून तो केव्हा पसार झाला हे कोणालाही कळलेच नाही. यंदाच्या लग्नसराईमध्ये घडलेला हा पहिलाच गुन्हा आहे.
या पाश्र्वभूमीवर परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी म्हणाले, लग्नसराईच्या दिवसांत चोरटे मंगल कार्यालये आणि लॉनमध्ये सहजगत्या शिरकाव करतात. विशेषत: वधू आणि वर पक्षाकडील मंडळी गडबडीत असतात. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे महागडे ऐवज असलेल्या पर्स लांबवून पसार होतात. त्यामुळे प्रत्येकाने आपले मौल्यवान ऐवज सांभाळण्याची दक्षता घ्यायला हवी.
पुणे शहरात सर्वाधिक लॉन एरंडवणे परिसरातील म्हात्रे पुलानजीक असलेल्या डीपी रस्त्यावर आहेत. म्हात्रे पूल ते राजाराम पूल या रस्त्यावर सात लॉन्स आहेत. दरवर्षी लग्नसराईच्या मोसमात विवाह समारंभात चोऱ्या होण्याच्या घटना घडतात. मुळातच लॉनच्या अंतर्गत पोलीस बंदोबस्त ठेवणे शक्य आहे. मंगल कार्यालये आणि लॉनमधील चोऱ्या रोखण्यासाठी चालकांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही दोशी यांनी सांगितले.
लग्नसराईमध्ये मंगल कार्यालये आणि लॉनमध्ये शिरकाव केलेले चोरटे मौल्यवान चीजवस्तू लांबवितात. शहरातील प्रत्येक लॉनमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करणे शक्य नाही. लॉन आणि मंगल कार्यालयाच्या चालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी. त्यामुळे अशा प्रकारच्या चोऱ्यांना आळा घालणे शक्य होईल, याकडेही दोशी यांनी लक्ष वेधले.

अशी बाळगा सावधानता
– मंगल कार्यालय आणि लॉन्समध्ये सीसीटीव्ही बसवावेत.
– अंतर्गत भागात सुरक्षारक्षक नियुक्त करावा.
– वधू-वर पक्षाच्या खोल्यांमध्ये तिजोरीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:15 am

Web Title: be aware in wedding ceremony
Next Stories
1 – ‘कॉइनेक्स’ प्रदर्शन गुरुवारपासून तीन दिवस
2 BLOG : डोनाल्ड ट्रम्प यांचं ‘ते’ विधान आणि बरंच काही…
3 लोकसत्ता मार्ग यशाचा’ आज पुण्यात
Just Now!
X