पिंपरी-चिंचवड शहरात नायझेरियन फ्रॉडचं प्रमाण वाढल्याचं दिसत असून विना सुरक्षारक्षक असलेलं एटीएम शोधून सर्वसामान्य नागरिकांचा एटीएम पिन, एटीएम कार्डचा डेटा चोरला जात आहे. असाच प्रकार सांगवी पोलिसांनी हाणून पाडला आहे. पिंपळे गुरव परिसरातील सुवर्ण पार्क येथे ICICI बँकेच्या एटीएममध्ये अज्ञातांनी स्कीमर आणि छुपा कॅमेरा बसवला होता. मात्र, पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा प्रकार समोर आणला असून त्यामुळे शेकडो जणांची फसवणूक टळली आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर आणि पोलीस कर्मचारी शिमोन चांदेकर यांची हा प्रकार समोर आणला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरातील सुवर्ण पार्क परिसरात असणाऱ्या ICICI बँकेच्या एटीएम मशीनच्या स्कीमरमध्ये (कार्ड स्वॅप करतो ती जागा) एक चिप बसवण्यात आली होती. तिथे तुम्ही पैसे काढायला गेल्यानंतर एटीएम कार्ड स्कीमरमध्ये घालताच तुमच्या कार्डमधील सर्व माहिती (डेटा) ही चिपमध्ये जात होती. तसेच ज्या ठिकाणी आपण पिन नंबर टाकतो तिथे देखील वर एक छिद्र पाडून छुपा कॅमेरा बसवण्यात आला होता. पैसे काढणाऱ्या व्यक्तीने पिन टाकताच तो पिन कॅमेऱ्यात कैद होत होता अशी माहिती पोलीस कर्मचारी शिमोन चांदेकर  यांनी दिली.

दरम्यान, अशा प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित घटनेचा पर्दाफाश केला. परंतू, चिप आणि कॅमेरा कधी लावला गेला आणि किती जणांचा डेटा चोरला गेला असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित सायबर क्राईमला नायझेरियन फ्रॉड असे संबोधले जाते. यामध्ये नायझेरियन व्यक्ती, दिल्ली आणि झारखंड येथील अज्ञात चोरटे ही टेक्निक वापरून अनेकांची फसवणूक करतात, असे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

एटीएम सेवा रामभरोसे!

एटीएम मशीनसाठी बहुतांश ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने अज्ञात चोर अशा एटीएमला लक्ष करतात आणि त्यात चिप आणि कॅमेरा बसवत असल्याचे आत्तापर्यंत निदर्शनास आले आहे.

एटीएम मधून पैसे काढताना काय काळजी घ्यावी

एटीएममध्ये कार्ड स्वॅप केल्यानंतर पिन टाकताना वरच्या बाजूला हात ठेवावा. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी छुपा कॅमेरा असेल तर त्यात तुमचा पिन चित्रीत होणार नाही. तसेच एटीएम कार्ड स्वॅप करताना स्कीमर ओढून पाहणे. ज्यामुळे त्या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आहे की नाही हे स्पष्ट होईल.