भात, घेवडा, बटाटे, टोमॅटो- अगदी रोजच्या जेवणात खाल्ले जाणारे पदार्थ. पण हेच पदार्थ खाल्ल्यानंतर एखाद्याला त्रास होऊ लागला तर?.. अन्नपदार्थाच्या अॅलर्जीत पुण्यात हिरव्या घेवडय़ाच्या अॅलर्जीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. तर त्याच्या खालोखाल समुद्री आहारातील खेकडय़ांची अॅलर्जी सर्वाधिक आहे. ‘पी.एच. डायग्नोस्टिक सेंटर’ने गेल्या वर्षभरात केलेल्या चाचण्यांच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.
विशिष्ट अन्नपदार्थातील प्रथिनांचा शरीरावर दिसू शकणारा विपरीत परिणाम म्हणजे अन्नपदार्थाची अॅलर्जी. स्वतंत्र अन्नपदार्थ आणि विविध अन्नपदार्थाचे गट अशा दोन स्वरूपांत अन्नपदार्थाची अॅलर्जी तपासली जाते. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता हिरवे घेवडे आणि खेकडय़ांनंतर तुरळक मंडळींना बटाटे आणि योघर्ट (दहीसदृश पदार्थ) यांचीही अॅलर्जी असल्याचे दिसून आले. तर अन्नपदार्थाच्या गटाला असणारी अॅलर्जी तपासली असता ‘भात, बटाटा, टोमॅटो आणि मोहरी’ या गटातील अन्नपदार्थ सर्वाधिक ‘अॅलर्जिक’ ठरत असल्याचे दिसले. खेकडे, झिंगे आणि इतर मासे या गटाला असलेली अॅलर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर ‘फळे, तेलबिया आणि कडधान्ये’ या गटाचीही अॅलर्जी तुरळक व्यक्तींना आहे. अन्नपदार्थाची अॅलर्जी असलेले सर्वाधिक रुग्ण ३० ते ४० या वयोगटातील असल्याचेही दिसून आले आहे.
याबाबत शहरातील एका पॅथोलॉजिस्टने सांगितले, ‘‘एखाद्या अन्नपदार्थाची अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तीला तो पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच किंवा काही वेळानेही त्रास होऊ शकतो. या परिणामांमध्ये त्वचा किंवा चेहरा लाल, गरम झाल्यासारखा वाटणे (फ्लशिंग), श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे, त्वचेला खाज सुटणे, उलटी होणे आणि घशाला सूज येणे हे त्रास मोठय़ा प्रमाणावर दिसतात. काही वेळाने दिसणाऱ्या परिणामांमध्ये उलटय़ा, जुलाब किंवा अपचनासारखे त्रास उद्भवतात. ज्या रुग्णांना अॅलर्जीचा तीव्र त्रास असतो त्यांना रक्तदाब कमी होणे, अंगावर सूज येणे अशी तीव्र लक्षणे दिसू शकतात. अशा तीव्र अॅलर्जीत रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते, पण हे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे.’’