‘सुंदरता का रंगमंच-जायकवडी बांध’ या डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित माहितीपटाची सहाव्या नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रातर्फे (ईएमआरसी) या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान प्रसार इन्स्टिटय़ूटतर्फे ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्र (नेहरू सायन्स सेंटर) येथे सहावा नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये या माहितीपटाचे प्रदर्शन होणार आहे. या माहितीपटामध्ये जायकवडी धरण परिसरात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा विषय हाताळण्यात आला आहे. देश-परदेशातून येथे येणारे इबिल, स्टीव्ह, ब्राह्मणी डक, पर्पल मॉर्गन, फ्लेिमगो या पक्ष्यांची जीवनशैली टिपण्यात आली आहे. त्यासाठी संशोधनाची माहिती डॉ. लक्ष्मण मटकर यांनी तयार केली आहे. निसर्ग अभ्यासक, पक्षी निरीक्षक आणि विज्ञानाचे विद्यार्थी यांच्यासाठी हा माहितीपट महत्त्वपूर्ण आहे. डॉ. बाळकृष्ण दामले यांनी यापूर्वी शंभरहून अधिक माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून त्यांना चार पारितोषिके मिळाली आहेत.