प्रशासनाकडून विविध शासकीय योजना व सेवा-सुविधांसाठी टप्प्याटप्प्याने आधार कार्ड गरजेचे करण्यात येत आहे. त्यामुळे आधार कार्ड आता प्रत्येकासाठी अत्यावश्यक बाब झालेली आहे. यापूर्वीही प्रशासनाने शहर व जिल्ह्य़ामध्ये आधार नोंदणीसाठी मोहिमा राबविल्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकाच वेळी आधार नोंदणी करण्यात येणार आहे. पण, या सर्व मोहिमांमध्ये वृद्धत्व किंवा वेगवेगळ्या व्याधींमुळे घराबाहेर पडू न शकणारे नागरिक दुर्लक्षित राहिले आहेत. विविध योजनांसाठी त्यांनाही आधार कार्डची गरज आहे. पण, या व्यक्तींसाठी आधार नोंदणीची वेगळी व्यवस्था नसल्याने अद्यापही प्रशासनाकडून त्यांना ‘आधार’ मिळालेला नाही.
आधार कार्डचा क्रमांक वेगवेगळ्या सेवांशी जोडण्याचे काम सध्या करण्यात येत आहे. बँकेच्या खात्याशी आधार कार्डची जोडणी न केल्यास आता स्वयंपाकाचा गॅसही मिळू शकत नाही. सध्या मतदार ओळख पत्र व आधार कार्डच्या जोडणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात सर्वच प्रकारच्या योजनांसाठी आधार कार्डची गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधार कार्डच्या नोंदणीसाठी शहरभर कार्यक्रम राबविले. त्यातून बहुतांश नागरिकांनी आधार कार्डची नोंदणी केली. यापुढेही याबाबत मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
शाळा, शासकीय कार्यालये, बँका आदी ठिकाणी आधार नोंदणीच्या मोहिमा राबविण्यात येतात. मात्र, घरातून बाहेर पडता येत नसल्याने या ठिकाणी पोहोचू न शकणाऱ्यांना अद्यापही आधार कार्डची नोंद करता आली नाही. ज्येष्ठ नागरिक, अपंग, अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. मुख्यत: पुणे शहरामध्ये एकटे राहणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. आधार नोंदणी नसल्यास स्वयंपाकाच्या गॅसपासून भविष्यात पेन्शन मिळण्यासही त्यांना अडचणी निर्माण होतील.
सजग नागरी मंचच्या वतीने ही बाब दोन वर्षांपूर्वीच प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती. घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या लोकांची घरोघरी जाऊन आधार नोंदणी करण्याची गरज असल्याचेही त्या वेळी सांगण्यात आले होते. मंचने लक्षात आणून दिलेली वस्तुस्थिती मान्य करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन आधार नोंदणी करण्यासाठी मोबाईल व्हॅन सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ही व्हॅन अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे आता मंचच्या वतीने अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी पुन्हा प्रशासनाकडे याबाबतची मागणी केली आहे. नव्याने आधारची नोंदणी सुरू होत असताना त्यात प्राधान्याने मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करावी, अशी मागणी मंचने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.