देशभरात लोकसभेची रणधुमाळी चालू असताना प्रत्येक पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा आणि सभाची तयारी केली जात आहे. यंदा पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या सभेचा प्रचाराचा नारळ प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कोथरूड येथे फोडण्यात आला.

या सभेला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. या सभेदरम्यान महायुतीमधील घटक पक्षाच्या सात नेत्यांची खूप वेळ चाललेल्या भाषणामुळे सभा ठिकाणी असलेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांनी प्रकाश जावडेकर यांच्या भाषणापूर्वी बाहेर पडणे पसंत केले. नागरिक बाहेर जाताना पाहून आयोजकांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचाराचा नारळ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे तसेच भाजपचे शहरातील आमदार आणि पदाधिकारी सभेला उपस्थित होते.

काय म्हणाले जावडेकर

सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर काही जण किती दहशतवाद्यांना ठार मारले याबाबतची आकडेवारी आणि पुरावे मागत आहेत. सैन्य दलाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम केले जात आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली.

यावेळी प्रकाश जावडेकर म्हणाले की, पुलवामा घटनेनंतर मोदी सरकारने भारतीय सैन्याला परवानगी देऊन दहशतवाद उद्धवस्त करण्यासाठी सज्जता दिली. ती फक्त मोदींनी दिली असून युपीए सरकारच्या काळात का त्यांच्या पंतप्रधानांनी दिली नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आपला देश केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मुंबई वर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी राष्ट्राचे प्रमुख तसेच गृहमंत्री अशा सर्व लोकांनी दहशतवादाची घटना छोटी छोटी बाते होती रहती असे म्हणून त्यावर भाष्य केले. यातून देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो अशा शब्दात काँग्रेसवर निशाणा साधला.