शिशु स्तनपानासाठी दररोज किमान २५ महिलांकडून वापर

तुळशीबागेतील खरेदी असो किंवा गणपतीचे दर्शन करीत असताना बरोबर असलेले लहान बाळ रडायला लागले तर बाळाची भूक भागवून त्याला शांत करण्यासाठी महिलांना ‘अनसूया कक्षा’चा लाभ होत आहे. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टने शिशु स्तनपानासाठी सुरू केलेल्या या कक्षाचा गणेशोत्सव काळात दररोज किमान २५ महिलांकडून वापर केला जात आहे. गणेशोत्सवामुळे हा कक्ष २४ तास उघडा ठेवण्यात आला आहे.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गोकुळ अष्टमीला शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्ष सुरू करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, माजी उपमहापौर डॉ. शंकरराव तोडकर, सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सहायक आयुक्त राजेश चव्हाण, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, कार्यकारी विश्वस्त बी. एम. गायकवाड, खजिनदार अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, चंद्रशेखर हलवाई, युवराज गाडवे यांच्या उपस्थितीत या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. असा उपक्रम राबविणारे पुणे शहरातील हे पहिलेच मंदिर ठरले आहे.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराजवळ बाजारपेठ आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या खरेदीसाठी आवडते ठिकाण असलेला तुळशीबाग परिसरही याच भागात आहे. बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी झाल्याने महिलांना अनेक अडचणी येतात. अनेकदा महिलांकडे लहान मुले असतात. गर्दीचा बाळाला त्रास होतो आणि ते चिडचिड करू लागते. बऱ्याचदा बाळाला भूक लागते तेव्हा शिशु स्तनपान कोठे करायचे हा प्रश्न भेडसावतो. ही बाब ध्यानात घेऊन अनसूया कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिरीष मोहिते यांनी सांगितले.

दत्तमंदिराच्या पहिल्या मजल्यावरील अनसूया कक्ष पूर्णपणे सुरक्षित असून दररोज किमान २५ महिलांकडून त्याचा वापर केला जात आहे, असे अ‍ॅड. शिवराज कदम यांनी सांगितले. हा कक्ष कायमस्वरूपी असला तरी गणेशोत्सवाच्या काळात २४ तास खुला ठेवण्यात आला आहे. मंदिराच्या सेवेतील दोन महिलांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासमवेत आलेल्या महिलेला त्या कक्षामध्ये घेऊन जातात. बाळाचे रडणे थांबल्यानंतर महिला आपल्या कामाला निघून जातात. रात्री आठ ते सकाळी आठ या वेळासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘लेडी बाउन्सर’ ही कामगिरी बजावतात, असे शिवराज कदम जहागीरदार यांनी सांगितले.

बाळाची घरच्यासारखी काळजी

देवाच्या दर्शनासाठी किंवा तुळशीबागेत खरेदी करण्यासाठी आम्ही या परिसरात येतो. गर्दीमध्ये गांगरून गेलेले बाळ रडायला लागले तर काय करायचे हा प्रश्न होता. पण, दत्तमंदिराच्या अनसूया केंद्रामुळे आमच्या बाळाची अगदी घरच्यासारखी काळजी घेतली गेली आहे, अशी भावना या केंद्राचा लाभ घेतलेल्या महिलेने व्यक्त केली असल्याचे कदम यांनी सांगितले.