युनिक फीचर्सतर्फे आयोजित मराठी ई-साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांची निवड झाली आहे. http://www.uniquefeatures.in या संकेतस्थळावर भरवल्या जाणाऱ्या या अभिनव संमेलनाचे यंदा तिसरे वर्ष आहे.
मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये २० मार्च रोजी या संमेलनाचे उद्घाटन होणार असून त्या दिवसापासून जगभरातील मराठी साहित्य रसिकांसाठी हे संमेलन संकेतस्थळावर खुले होणार असल्याची माहिती युनिक फीचर्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी आणि संपादक-संचालक सुहास कुलकर्णी यांनी दिली. ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार रत्नाकर मतकरी यांनी पहिल्या संमेलनाचे तर, ज्येष्ठ कवी ग्रेस यांनी दुसऱ्या ई-संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. लिखित मजकुराबरोबरच ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात मान्यवरांची उपस्थिती या संमेलनात असेल.
मराठी साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांची इंटरनेटच्या जागतिक व्यासपीठावर फारशी नोंद घेतली गेलेली नाही. हे वास्तव ध्यानात घेऊन युनिक फीचर्सतर्फे या ई-संमेलनाच्या निमित्ताने दहा दिवंगत लेखक-कवींचे वेब डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये ते उपलब्ध असेल. हा उपक्रम केवळ ई-संमेलनापुरताच सीमित नसून यापुढेही मराठी साहित्यिकांना इंटरनेटवर आणण्याचे काम सुरूच राहणार आहे.