भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत मानद सचिव डॉ. मैत्रेयी देशपांडे आणि भूपाल पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद यश संपादन केले आहे. संस्थेच्या नियामक मंडळाच्या नव्याने निवडून आलेल्या २५ सभासदांमध्ये ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीच्या कार्यकाळामध्येच संस्थेचे शताब्दी वर्ष सुरू होत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
या निवडणुकीसाठी २ हजार ६५ आजीव सभासदांना मतपत्रिका रवाना केल्या होत्या. त्यापैकी २६ मतपत्रिकांवर पोस्टाने मयत असा शिक्का मारला आहे. ७९७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्यापैकी ३७८ मतपत्रिका पोस्टाद्वारे परत आल्या. आपण मतदान करीत असल्याची मतदाराची स्वाक्षरी असलेल्या मतपत्रिका ग्राह्य़ धरल्या जातील संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ठरावाद्वारे केला होता. त्यामुळे अशा स्वाक्षरी नसलेल्या किंवा २५ हून अधिक उमेदवारांना मतदान केले अशा ३७ मतपत्रिका बाद ठरल्या. त्यामुळे या निवडणुकीसाठी ७६० जणांनी मतदान केले, अशी माहिती देत संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. यंदाची निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने राबविण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.
या निवडणुकीत अभय फिरोदिया, अनिरुद्ध देशपांडे, शिल्पा सुमंत, प्रमोद जोगळेकर, सुधीर वैशंपायन, वसंत वैद्य, नंदकुमार एकबोटे, श्रीनिवास कुलकर्णी, सुनील त्रिंबके, अरुण नहार, संजय पवार, राजाराम पाठक आणि डी. एन. मंडलेकर हे १३ उमेदवार प्रथमच निवडून आले आहेत. तर, डॉ. सूर्यकांत हयातनगरकर आणि डॉ. गो. त्र्यं. पानसे हे विद्यमान शासकीय सदस्य नियामक मंडळावर आले आहेत. हयातनगरकर आणि विजय बेडेकर हे दोघे जण पुण्याबाहेरील सदस्य आहेत. विद्यमान नियामक मंडळातील विद्याधर भाटे, वा. ल. मंजूळ यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नव्हता. गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेले डॉ. मो. गो. धडफळे यंदाच्या नियामक मंडळामध्ये नसतील.
विजयी उमेदवारांची नावे आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे
डॉ. मैत्रेयी देशपांडे – ६९०, डॉ. ग. उ. थिटे – ६७९, डॉ. श्रीकांत बहुलकर – ६६०, विजय बेडेकर – ६५९, शिल्पा सुमंत – ६४९, डॉ. सदानंद मोरे – ६३२, अभय फिरोदिया – ६२९, अॅड. विनायक अभ्यंकर – ६२७, प्रा. हरी नरके – ६१३, श्याम सातपुते – ६०३, भूपाल पटवर्धन – ६०१, प्रमोद जोगळेकर – ५९९, सुधीर वैशंपायन – ५९८, वसंत वैद्य – ५७६, नंदकुमार एकबोटे – ५७५, श्रीनिवास कुलकर्णी – ५७३, अनिरुद्ध देशपांडे – ५६७, पं. वसंत गाडगीळ – ५६६, डॉ. गो. त्र्यं. पानसे – ५३८, सुनील त्रिंबके – ५२७, अरुण नहार – ५२४, संजय पवार – ५०३, डॉ. सूर्यकांत हयातनगरकर – ४९२, राजाराम पाठक – ४४६, डी. एन. मंडलेकर – ४३८