हजारो वर्षांपूर्वीची, प्राचीन हस्तलिखिते पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या संचालक मैत्रेयी देशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर, श्रीकांत बहुलक आदी उपस्थित होते. पानावर लिहिलेला मजकूर, दगडावर कोरून ठेवलेला मजकूर, असे हस्तलिखितांचे प्रकार या प्रदर्शनामध्ये पाहता येणार आहेत. संस्कृत, मराठी, अरबी, फारसी अशा भाषांमधील आणि विविध लिपींमधील हस्तलिखिते या प्रदर्शनात असणार आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्येच हे प्रदर्शन होणार आहे. शनिवारी (८ फेब्रुवारी) व रविवारी (९ फेब्रुवारी) या दोन दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी आठ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. प्रदर्शनाचे उद्घाटन सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे.