‘ईशान्य भारतात लोकवस्ती विरळ आहे. त्यामुळे संसदेत या भागातील राज्यांचे प्रतिनिधीत्व कमी आहे. मात्र, ईशान्येतील आठही राज्ये हे भारताचे महत्त्वाचे अंग असून ही राज्ये मुख्य प्रवाहातच आहेत,’ अशी भावना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली.
माईर्स एमआयटीतर्फे दिल्या जाणाऱ्या भारत अस्मिता पुरस्काराच्या वितरण समारंभात रिजिजू बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते रिजिजू यांना जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला. या वर्षी भारत अस्मिता जन जागरणश्रेष्ठ पुरस्कार दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीजचे (डिक्की) मिलिंद कांबळे यांना देण्यात आला. भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार आयआयएम अहमदाबादचे संचालक डॉ. आशीष नंदा यांना देण्यात आला. या वेळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक राहुल कराड, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव मंगेश कराड आदी उपस्थित होते.
या वेळी रिजिजू म्हणाले, ‘राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात. राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी नकारात्मक आहे. परंतु आपण ती बदलली पाहिजे. लोकशाहीमुळे आपला आवाज आणि स्वातंत्र्य अबाधित आहे. त्यामुळेच देशात सहिष्णुता आहे. स्वातंत्र्य मिळाले नाही की, त्याचा स्फोट होतो आणि अरब देशांप्रमाणे िहसाचार वाढतो. सोशल मिडियावर पंतप्रधानांबद्दल लिहिले, बोलले जाते मात्र त्यावर कारवाई होत नाही हे सहिष्णुतेचेच लक्षण आहे.’ मिलिंद कांबळे म्हणाले, ‘नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे होणे अधिक महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समन्वयातून विकास या सूत्रावर आम्ही काम करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्था झपाटय़ाने विकसित होत असून तरुणांनी आपल्यातील देशप्रेमाला जागे ठेवण्याबरोबरच प्रगतीत योगदान द्यावे.’
‘ऊर्जा असलेली तरुणाई देशाच्या प्रगतीत योगदान देत आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल होत आहे. मात्र पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात अधिक काम होण्याची गरज आहे,’ असे मत डॉ. आशिष नंदा यांनी व्यक्त केले.