नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने सिंगापूर येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील भावी पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुला-मुलींना मराठी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मायमराठीच्या विश्वात्मक संवर्धनाबरोबरच तेथील मुलांना मराठी भाषा आणि साहित्याची गोडी लागणार आहे.

भारती विद्यापीठ आणि  सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. सातासमुद्रापार मराठी भाषा जपण्यासाठी भारती विद्यपीठाने आणखी एक पाऊल उचलले असून यापूर्वी अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाबरोबर सामंजस्य करार करून अमेरिकेतील मुलांना मराठी शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

भारती विद्यापीठ, पुणे आणि सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्यातील सामंजस्य करारानुसार भारती विद्यापीठ तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम, पुस्तके, परीक्षा प्रमाणपत्रे देणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची आखणी, प्रश्नपत्रिका, परीक्षांचे नियोजन आणि निकाल ही कामे महाराष्ट्र मंडळाने नियुक्त केलेली शिक्षकांची समिती करेल.  हा करार ३१ मार्च २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.  या सामंजस्य करारावर भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ.एम. एस. सगरे आणि महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा नलिनी थिटे यांची स्वाक्षरी आहे.

या विषयी माहिती देताना डॉ. सगरे म्हणाले, सिंगापूरमध्ये तीन हजारांहून अधिक कुटुंबे नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत.  तेथील मराठी माणसांनी एकत्र येऊन ऑगस्ट १९९४ मध्ये महाराष्ट्र मंडळ, सिंगापूरची स्थापना केली. त्यातून सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळाली. महाराष्ट्र मंडळाचे ग्रंथालय सुरू झाले. महाराष्ट्र मंडळाने सिंगापूर येथे ८ मे २०१७ पासून मराठी शाळा सुरू केली असून ही शाळा उत्तम प्रकारे चालविली जात आहे. भारती विद्यापीठाने महाराष्ट्र मंडळाला दिलेला प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यातून सामंजस्य कराराला चालना मिळाली. भारती विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजित कदम आणि प्र-कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून मराठीच्या जतनासाठी अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाप्रमाणेच सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाला सहकार्य करण्याचे ठरविले आहे.