पुणे : भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे श्रेय कोणाला यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील वाद शमला असतानाच योजनेच्या उद्घाटन प्रसंगी मात्र दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घोषणा देत परस्परांना भिडले. सभागृहात दोन्ही पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर असताना, सभागृहाबाहेर मात्र जोरदार घोषणायुद्ध बघायला मिळाले.

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस सभागृहात दाखल झाल्यानंतर अजित पवार सभागृहाकडे निघाले असताना भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट, मोदी, मोदी, फडणवीस तुम आगे बढो, जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी सुरू के ली.

त्यांच्या या घोषणेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा, अजित दादा’ अशा घोषणाबाजीने उत्तर दिले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे सभागृहाबाहेर गोंधळ सुरू झाला. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावल्यानंतरही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. सभागृहाबाहेर हा प्रकार सुरू असताना सभागृहात मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विकासाच्या मुद्दय़ावर राजकारण न करण्याचे आश्वासन दिले. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांमधील वाद संपविला.