राजकीय श्रेयासाठी पिंपरीत सत्ताधाऱ्यांची धडपड

राष्ट्रवादी काँग्रेसची १५ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून पिंपरी पालिकेचा ताबा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची शहरात अल्पावधीत नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्याच कारणास्तव पक्षश्रेष्ठींनी शहरात येऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. काहीतरी सुधारणा करू, असा पवित्रा आता कारभाऱ्यांनी घेतला आहे. चांगले निर्णय प्रशासकीय पातळीवर जाहीर होतात, तसे यापुढे होऊ न देता पालिकेतील महत्त्वपूर्ण निर्णय महापौरांकडूनच जाहीर करण्यात येतील, असा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असून त्यामागे राजकीय श्रेय मिळावे, असाच हेतू असल्याचे दिसून येते.

पिंपरी पालिका भाजपच्या ताब्यात आली, त्यास सहा महिने उलटून गेले आहेत. या कालावधीत भाजपला ठोस अशी कामगिरी करता आलेली नाही. पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही व त्यांचे एकमेकांशी पटत नाही. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. अजूनही अधिकारी राष्ट्रवादीच्याच प्रभावाखाली आहेत. नव्या सत्ताधाऱ्यांकडून ज्या गोष्टी होणे अपेक्षित आहे, त्या होत नाहीत आणि नको ते उद्योग सर्रास सुरू आहेत. स्थायी समितीच्या कारभारावरून प्रचंड खदखद आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून शहरातील जनतेने भाजपकडे कारभाराची सूत्रे दिली. मात्र, अल्वावधीत भाजपने राष्ट्रवादीचाच कित्ता गिरवण्यास सुरुवात केली  आहे. येथील कारभाराच्या सुरस गोष्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच श्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या व त्याचा परिणाम म्हणून २७ सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट आणि राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी पिंपरी पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यामध्ये सुधारणा करण्याची तंबीही दिली.  त्यानंतर, स्थानिक नेत्यांनी काही प्रमाणात आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. नकारात्मक प्रतिमा होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवताना पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या चांगल्या निर्णयाचे श्रेय मिळवण्याचा आटापिटा भाजपने सुरू केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयांची घोषणा महापौरांनीच करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर निर्देश देण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या करसंकलन विभागाची ‘अभय योजना’ महापौर नितीन काळजे यांच्या नावाने जाहीर करण्यात आली आहे. प्रवीणसिंह परदेशी, दिलीप बंड, आशिष शर्मा, श्रीकर परदेशी, राजीव जाधव अशा पिंपरीतील अनेक आयुक्तांनी त्या-त्या वेळी असणाऱ्या महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रसिद्धी मिळवलेली आहे. हा अनुभव स्थानिक नेत्यांच्या गाठीशी आहे. सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर प्रसारमाध्यमांपासून चार हात दूरच राहात असल्याने भाजपच्या सोयीचेच राहणार आहे.