बहिणीने भावाला ओवाळण्याच्या पारंपरिक पद्धतीची भाऊबीज मंगळवारी घरोघरी आनंदी वातावरणात साजरी झाली. त्याचबरोबर अनाथ, उपेक्षित, निराधार बहिणींची आणि भावांचीही आठवण ठेवत पुण्यातील अनेक संस्था-संघटनांनी मंगळवारी आगळी-वेगळी भाऊबीज साजरी केली. सामाजिक उपक्रमांच्या या भाऊबीजेबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि दीपोत्सवांचेही आयोजन शहरात करण्यात आले होते.
भाऊबीजेच्या निमित्ताने मंगळवारी पहाटे शहरात विविध ठिकाणी दीपोत्सव तसेच संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, अग्निशमन दलाचे जवान, महिला पोलीस कर्मचारी यांच्यासमवेतही भाऊबीज साजरी करण्यात आली. या निमित्ताने उपेक्षित विद्यार्थ्यांना मदत देण्याचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
अग्निशमन दलासाठी भाऊबीज
भाऊबीजेच्या दिवशी अग्निशमन दलातील जवानांची आठवण पुणेकरांनी ठेवली आणि जवानांबरोबर भाऊबीज साजरी केली, हा आमच्यासाठी अविस्मरणीय ठेवा आहे, असे मनोगत अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी मंगळवारी व्यक्त केले. कै. शंकरराव भोई प्रतिष्ठानतर्फे आयोजित भाऊबीज कार्यक्रमात रणपिसे बोलत होते. दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध धर्म व पंथांचे प्रमुख, तसेच गुरु यावेळी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार माधुरी मिसाळ, प्रतिभा मोडक, अशोक गोडसे, अजय भोसले, जयमाला इनामदार, रुपाली चाकणकर, राघवेंद्र कडकोळ, चारुदत्त आफळे, अॅड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
‘त्यागाची तयारी ठेवा’
गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळातर्फे वीरचक्र विजेते कर्नल सदानंद साळुंके यांच्यासमवेत भाऊबीज साजरी करण्यात आली. कर्नळ साळुंके यांनी या वेळी १९७१ च्या युद्धातील अनेक आठवणी सांगितल्या. देश हाच आपला धर्म आहे आणि देशासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. मंडळाचे विजय बढे, नंदकुमार कदम, राजू मापुसकर, मुकेश खामकर, गणेश अभंग यांनी संयोजन केले.
प्रभाग ५८ तर्फे ‘स्वरांजली’
भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्र. ५८ तर्फे भाऊबीजेनिमित्त ‘स्वरांजली’ या गायन कार्यक्रमाचे आयोजन पहाटे करण्यात आले होते. साठेबाग मंडळ आणि चैतन्य हास्य परिवार यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनात साहाय्य केले. नगरसेवक अशोक येनपुरे, प्रतिभा ढमाले तसेच विष्णू ठाकूर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये भाऊबीज
अभियान प्रतिष्ठानतर्फे महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फरासखाना पोलीस स्टेशन येथे भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवार, तसेच शेखर पवार, मुकुंद गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानतर्फे वेल्हे तालुक्यातील सिंगापूर येथे आदिवासी पाडय़ावर गेली पाच वर्षे दिवाळीनिमित्त धान्य, फराळ, कपडे आदींचे वाटप केले जात आहे.
‘रुग्णांबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत’
कुष्ठरुग्णांबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत यासाठीच अशा रुग्णांबरोबर भाऊबीज साजरी करतो आणि शेवटपर्यंत मी त्यांच्याबरोबरच भाऊबीज साजरी करणार आहे, असे मनोगत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनतर्फे कोंढवा येथील डॉ. बंदोरवाला लेप्रसी हॉस्पिटलमधील रुग्णांसवेत भाऊबीज साजरी करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्य बोलत होते. सर्वेश जोशी, फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, विक्रम जाधव, परशुराम शेलार तसेच डॉ. यशवंत फिलिप्स, कवी उद्धव कानडे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
देवदासी भगिनींना भेटवस्तू
युगंधर कला-क्रीडा मंचतर्फे अनाथ, निराधार देवदासी भगिनींसाठी दिवाळी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली दहा वर्षे हा उपक्रम केला जात आहे. देवदासींच्या मुलांना यावेळी फटाके तसेच भेटवस्तू, मिठाई देण्यात आली. अनिल कांबळे, यशवंत नाईक, विनोद मोदी, शिरीष मोहिते यांच्या हस्ते या वस्तू देण्यात आल्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू नाईक यांनी संयोजन केले.
वैकुंठात दीपोत्सव
वैकुंठ परिवारातर्फे वैकुंठ परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाच हजार पणत्या या वेळी लावण्यात आल्या होत्या. मार्केटयार्ड येथील बालशिक्षण मंच या वस्ती विभागातील मुलांसमवेत या वेळी दिवाळी साजरी करण्यात आली. संदीप खर्डेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रंगावलीकार रामदास चौंडे, बालसाहित्यिक दत्ता टोळ, शिक्षण मंडळाच्या सदस्या मंजुश्री खर्डेकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.