भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयातून दिलासा मिळू शकलेला नाही. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज पुणे न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला असून न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने तेलतुंबडे यांना अटक होण्याची शक्यता आहे.

तेलतुंबडे यांनी पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळाले आहेत, त्यामध्ये तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा असे सूचित करण्यात आले. मात्र हा मेल बनावट असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. आनंद तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून २०१७ ला पॅरिसला गेले होते. त्याचा खर्च हा त्या विद्यापीठाने केला होता.या दौऱ्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही, असेही बचावपक्षाचे म्हणणे होते. न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. जर कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही. तर कॉम्रेडचा अर्थ आनंद तेलतुंबडे कसा होईल, असा दावा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.

सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल दिला. न्यायालयाने तेलतुंबडे यांचा अर्ज फेटाळला असून आता लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.