नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेले तेलंगणातील विद्रोही कवी वरवरा राव, सुधा भारद्वाज, वेरनोन गोन्साल्विस, अॅड. अरुण परेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याचे आदेश विशेष न्यायाधीश के डी वडणे यांनी दिले.

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन राव, भारद्वाज, गोन्साल्विस, अॅड परेरा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अटकेला २५ नोव्हेंबर रोजी ९० दिवस पूर्ण झाले आहेत. संशयितांविरोधात वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यास त्यांना जामीन मिळू शकतो. संशयितांवर ‘यूएपीए’ (बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा) नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती पोलिसांकडून विशेष न्यायालयाकडे करण्यात आली होती. विशेष न्यायालयात सरकार पक्ष तसेच बचाव पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यास आणखी ९० दिवसांची मुदतवाढ दिली.