भीमा कोरेगाव या ठिकाणी १ जानेवारी रोजी उसळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगळे या तरूणाचा बळी गेला. राहुल फटांगळेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी राहुलचा मावस भाऊ तेजस धावडे याने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेजस धावडेने ही मागणी केली. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जाधव, तुषार काकडे यांचीही उपस्थिती होती.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात १ जानेवारीला राहुलचा मृत्यू झाला. या घटनेला बुधवारी १० दिवस पूर्ण होत आहे. सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चातर्फे बंद पाळण्यात येण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यात तथ्य नाही अशी माहिती तेजस धावडे यांनी दिली. तसेच बुधवारी कान्हूर मेंसाई या ठिकाणी शोकसभा घेण्यात येणार आहे असेही त्याने सांगितले.

राहुल फटांगळेला व्यायामाची आवड होती त्यामुळे त्याच्या नावाने व्यायामशाळा उभारण्यात यावी अशीही मागणी तेजस धावडे यांनी केली. भीमा कोरेगाव आणि त्या शेजारच्या गावांमध्ये हिंसाचार उसळला. या हिंसाचारात गावकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. हे नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे त्याची फक्त घोषणा न करता बॉण्डवर लिहून द्यावे अशीही मागणी धावडे यांनी केली.

१ जानेवारी रोजी पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव या ठिकाणी हिंसाचार उसळला. या हिंसाचारात राहुल फटांगळे या तरूणाचा मृ्त्यू झाला तर मोठ्या प्रमाणावर कार आणि इतर चाकी वाहने यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या सगळ्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदही करण्यात आला. आता राहुल फटांगळेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी त्याचा मावस भाऊ तेजस धावडेने केली आहे.

दरम्यान मंगळवारी पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात १२ जणांना अटक केली असून यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडीदेखील सुनावली आहे. आता आरोपींच्या चौकशीदरम्यान हा हिंसाचार का झाला?, दगडफेकीचे नेमके कारण काय?, जमावाला चिथावणी देण्यात आली होती का?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतील. आरोपींची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.