भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर राज्यभरात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी पुण्यात होऊ घातलेला नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पुण्यात उद्या वेध मराठी मनाच्या या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत होणार होती. मात्र, भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात उमटणारे पडसाद पाहता मुख्यमंत्र्यांनी पुणे दौरा रद्द केला आहे. त्यामुळे ते उद्याच्या कार्यक्रमाला उभे राहू शकणार नाहीत, अशी माहिती आयोजक रामदास फुटणे यांनी दिली.

भीमा कोरेगाव येथे काल झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत असून राज्यातील बहुतांश भागात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. याचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावर होताना दिसत आहे. मुंबई, डोंबिवली, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध शहरांमध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तर हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करु असे आश्वासन देतानाच आंदोलकांनी शांतता राखावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

भीमा कोरेगावातील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलक मुंबईतील चेंबूर स्थानकात रेल्वे रुळावर उतरले होते. भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ चेंबूर, गोवंडी आणि मुलुंडमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर डोंबिवलीतील शेलार नाका परिसरातही आंदोलन करण्यात आले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात तणावपूर्ण शांतता असून शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेशही लागू केले आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली असली तरी भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ हमाल संघटनांनी माल उतरवण्यास नकार दिला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता.