कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी झालेल्या दंगलीमधील पीडित आणि तिथे राहणारी पूजा सकट हिच्या हत्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं. तसंच  यावेळी गिरीश बापट यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर ५ महिने होऊन गेले पण अद्यापपर्यंत दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई या सरकारने केलेली नाही, ही निषेधार्थ बाब आहे.  जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पीडितांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,  अशी मागणी  यावेळी करण्यात आली.  रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्या नेतृतत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.  यावेळी,  ‘माझ्या मुलीची हत्या होऊन दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला. मात्र त्यातील आरोपीही अद्याप मोकाट आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी’,  अशी मागणी पूजा सकटच्या वडिलांनी केली.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या गोवंडी येथील घरातून ताब्यात घेतले. तर वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.