दत्तवाडी पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल

भीमा- कोरेगाव येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या दरम्यान बुधवारी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामध्ये वाहने, दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

शहरातील बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, लष्कर, दत्तवाडी, स्वारगेट, मार्केटयार्ड, पिंपरी, वाकड, निगडी, हडपसर आणि चंदननगर पोलीस ठाण्यात एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक चार गुन्हे दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. बंदच्या कालावधीत जमावाने शहरातील सोळा ठिकाणी दगडफेक केली. त्यामध्ये पीएमपी, स्कूल बससह खासगी मोटारींचे नुकसान झाले. अपर डेपो तसेच डॉल्फिन चौक परिसरात रस्ता अडवून एक बस, दोन स्कूल बस आणि एका मोटारीवर दगडफेक करण्यात आली. चत्रबन वसाहत आणि अप्पर इंदिरानगर बस डेपो येथे दगडफेकीत पीएमपीच्या चार बस आणि तीन खासगी वाहनांचे नुकसान झाले . याबाबत बिबवेवाडी पोलीस ठण्यात ५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील दांडेकर पूल भागात मोठय़ा प्रमाणावर जमाव आला होता. अज्ञात व्यक्तींनी पानमळा भाग आणि लोकमान्य नगर भागात बसवर दगडफेक केली. दांडेकर पूल येथे एका अल्पवयीन मुलाने बसवर दगडफेक केली.

ट्रायलक चौक आंबेडकर पुतळा, कॅम्प परिसरातील मोदीखाना कॅम्प भागात सकाळी वाहनांवर आणि दुकानांवर दगडफेक केली. याबाबत १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जहाँगीर हॉस्पिटल चौक, मोबाज चौक आणि ताडीवाला रोड येथे जमलेल्या जमावाने दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानांवर दगडफेक केली. याबाबत तीस ते चाळीस जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.   मार्केटयार्ड बसडेपोसमोर पीएमपी बस पेटविण्यात आली. याबाबत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भक्ती- शक्ती चौकात दुपारी बारा वाजता रास्ता रोको करून रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी ६० जणांविरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. िपपरीतील भाटनगरमध्ये टोळक्याने दगडफेक करीत खासगी वाहनांचे नुकसान केले. थेरगावच्या साईनाथनगर येथे हॉटेल तेजसमध्ये १५ जणांनी तोडफोड केली. हडपसरमध्ये रविदर्शन बस थांब्यासमोर सकाळी पावणे अकराला दोन बस फोडण्यात आल्या. यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगरमधील श्री स्वामी समर्थ हॉटेल येथे दगडफेक केल्याप्रकरणी ५७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.