गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची बुधवारी ७०-७५ टक्के आवक झाली. परंतु, सकाळी काही वेळ सोडल्यास ग्राहक नसल्याने भाज्यांचे भाव २० टक्क्य़ांनी घटले. पालेभाजी अक्षरश: एक ते दोन रुपयांनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. फूलबाजारातही ७० टक्के आवक झाली. तर, भुसार बाजारात बंद पाळण्यात आला. शहरातील किरकोळ भाजीविक्रेते, नागरिक खरेदीसाठी बाहेर न पडल्याने ३० ते ३५ टक्के माल शिल्लक राहिला. बंदमुळे किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली. आवकच्या तुलनेत मागणी घटल्याने फळभाज्यांच्या दरात १० ते २० तर, पालेभाज्यांच्या दरात ३० ते ३५ टक्क्य़ांनी घट झाली. बाजारातून मुंबई तसेच इतर शहरांमध्ये झेंडू, गुलछडी आदी फुलांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बंदमुळे माल न भरल्याने बहुतांश माल पडून होता, अशी माहिती मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.