02 March 2021

News Flash

शहरात तणाव; पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त

पीएमपी, एसटी गाडय़ांवर दगडफेकीचे प्रकार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पीएमपी, एसटी गाडय़ांवर दगडफेकीचे प्रकार; काही भागात दुकाने बंद

भीमा-कोरेगाव परिसरात सोमवारी दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी तणाव निर्माण झाला. हडपसर, पिंपरी भागात वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. शहरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे पोलिसांकडून पुणे शहर तसेच पिंपरी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जमावाकडून पीएमपीच्या २२ गाडय़ांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तोडफोडीत पीएमपी प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पीएमपी सेवा पोलिसांच्या सहकार्याने सुरळीत सुरू आहे.

भीमा-कोरेगाव येथे सोमवारी दोन गटात झालेल्या वादातून दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ तसेच मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद शहरात मंगळवारी उमटले. हडपसर भागातील भेकराईनगर येथे सकाळी पीएमपी बस आणि एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या भागातील बंदोबस्तात तातडीने वाढ करण्यात आली. विश्रांतवाडी भागातील मुख्य चौकात दुपारी बाराच्या सुमारास कार्यकर्ते जमले. कार्यकर्त्यांकडून भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यात आला. शहरात दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून तातडीने बंदोबस्तात वाढ करण्यात आली. खडकी, दापोडी, विश्रांतवाडी भागातील दुकाने बंद करण्यात आली.

पुणे स्टेशन परिसर, साधू वासवानी चौक, मांजरी, भेकराईनगर, गुलटेकडी, कात्रज येथील राजीव गांधी उद्यानानजीक, हडपसर, आव्हाळवाडी, गंगानगर, नेहरूनगर, पिंपरी-चिंचवड आणि देहू रोड भागात पीएमपी गाडय़ांची तोडफोड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक मंगळवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली.

राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील बंदोबस्तात मंगळवारी दुपारनंतर वाढ करण्यात आली. राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. या भागात राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील भागात शीघ्र कृती दलाच्या तुकडय़ा (रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स) तैनात करण्यात आल्या. पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका

समाज माध्यमातून प्रक्षोभक संदेश प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. समाजमाध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सायबर गुन्हे शाखेकडून देण्यात आला आहे. अशा प्रकारचे संदेश आढळल्यास तातडीने सायबर गुन्हे शाखेकडे (दूरध्वनी-०२०-२६१२३३४६) तक्रार करावी, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी दूरध्वनी-०२०- ६१२२८८०, १०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जिग्नेश मेवाणींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

शनिवार वाडा येथे रविवारी (३१ डिसेंबर) झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अक्षय बिक्कड आणि आनंद धोंड यांनी पोलिसांकडे तक्रारअर्ज दिला आहे. मेवाणी यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी तक्रारअर्जाद्वारे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 3:18 am

Web Title: bhima koregaon violence protests spread in maharashtra part 5
Next Stories
1 बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना
2 पोलिसांकडून करण्यात येणारी चारित्र्य पडताळणी ‘पेपरलेस’
3 चित्रपटसृष्टीतील अजरामर जोडय़ांना दिनदर्शिकेत स्थान 
Just Now!
X