भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज्यभरात भीमा कोरेगाव घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अशात पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली. पुण्यातील संवेदनशील भागांवर पोलिसांचे डोळ्यात तेल घालून लक्ष आहे अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली. पुण्यात वातावरण शांत आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचीही मदत आम्ही बंदोबस्तासाठी घेतल्याचे रश्मी शुक्ला यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी चिंचवडध्ये पीएमपीएमएलच्या ८ बस आणि काही चारचाकी वाहनांवर दडफेक करून त्यांच्या काचा फोडण्यात आल्या. हडपसर, विश्रांतवाडी, खडकी, पुणे स्टेशन परिसरात या घटना घडल्या आहेत. सोशल मीडियातील अफवांवर पुणेकरांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन रश्मी शुक्ला यांनी केले आहे.

शहरातील काही स्थानिक गटांनी पोलीस ठाण्यात जाऊन भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध करत असल्याचे निवेदन दिले. पुण्यात राज्य राखीव पोलिस दलाबरोबरच शीघ्र कृती दलाचे जवानही तैनात करण्यात आले असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. तसेच भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेमुळे सुट्टीवर असलेल्या सगळ्या पोलिसांच्या सुटट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचेही त्या म्हणाल्या. याबरोबरच सोशल मीडियावर वाहतुकीशी निगडीत अनेक मेसेज फिरत असले तरीही पुणे- मुंबई रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून अंतर्गत वाहतुकीबाबतही कोणतीही समस्या नसल्याचे चित्र आहे असेही समजते आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही शाळांना सुट्या देण्यात आल्या असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने येथील संचारबंदी कायम ठेवली आहे. या ठिकाणी अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे. तातडीने संचारबंदीचा आदेश लागू केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली अशी माहिती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुएझ हक यांनी दिली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन सुएझ हक यांनी केले.