21 October 2018

News Flash

आमच्या राहुलचा दोष काय..?

ऐन तारुण्यात कमावता मुलगा हिंसाचाराचा बळी ठरल्याने फटांगळे कुटुंबीय कोलमडून पडले आहे.

राहुल फटांगळे

भीमा-कोरेगावातील हिंसाचारात बळी गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त सवाल

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळे (वय २८) याचे कुटुंबीय त्याच्या मृत्यूनंतर कोलमडून पडले आहे. ऐन तारुण्यात जमावाच्या रोषाचा बळी ठरलेल्या राहुलचा दोष काय, असा आर्त सवाल त्याच्या कुटुंबीयांकडून विचारण्यात आला आहे.

भीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात शिरूर तालुक्यातील कान्हूर मसाई गावातील घोलपवाडी येथे राहणाऱ्या राहुल बाबाजी फटांगळे (वय २८) याचा मृत्यू झाला. शिक्रापूर भागात मृतावस्थेत सापडलेल्या राहुलच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम होती. मृतावस्थेत सापडलेल्या राहुलने श्री शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जाकीट परिधान केले होते. या जाकीटमुळे तो जमावाच्या रोषाला बळी पडला, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. राहुलचा मृतदेह सोमवारी रात्री शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांकडून ओळख पटविण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा राहुलचा मृत्यू झाल्याची माहिती फटांगळे कुटुंबीयांना मिळाली.

शवविच्छेदन अहवालात राहुलच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी दुपारी कान्हूर मसाई गावातील घोलपवाडीत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुलच्या मागे आई-वडील, चार भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याचा एक भाऊ ग्रामीण पोलीस दलात आहे. त्याच्या मृत्यूनंतर सरकारकडून फटांगळे कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ऐन तारुण्यात कमावता मुलगा हिंसाचाराचा बळी ठरल्याने फटांगळे कुटुंबीय कोलमडून पडले आहे.

याबाबत राहुचा भाऊ तुषार म्हणाला की, आमचे शेतकरी कुटुंब आहे. चंदननगर भागात राहुल गॅरेज चालवायाचा. सोमवारी सायंकाळी तो काम आटोपून शिक्रापूर भागातून निघाला होता. त्यावेळी जमावाने त्याला गाठले आणि बेदम मारहाण केली. आमचा कोणताही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंध नाही. नेमके काय घडले हे पोलिसांना माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

सरकारकडून आम्हाला आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असली तरी या घटनेमुळे आम्ही कोलमडून पडलो आहोत. राहुलचा  काही संबंध नसताना तो जमावाच्या रोषाला कसा बळी पडला, असा सवाल तुषारकडून उपस्थित करण्यात आला आहे.

First Published on January 4, 2018 3:33 am

Web Title: bhima koregaon violence rahul phatangale death