पाच वर्षांपूर्वी आघाडी धर्माची पायमल्ली झाल्याने विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवास सामोरे जावे लागलेले काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी लोकसभा निवडणुकीच्या ऐन मोक्याच्या क्षणी, आघाडी धर्माची खरी व्याख्या काय आणि तो पाळायचा म्हणजे नक्की काय करायचे, असे कळीचे मुद्दे उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादीने आधी पक्षनिष्ठा दाखवावी, मग आम्ही आघाडी धर्म पाळण्याचा ‘उत्साह’ दाखवू, असे खोचक विधान भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
मावळ लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून अॅड. राहुल नार्वेकर यांचे नाव जाहीर झाले. या पाश्र्वभूमीवर, भोईर यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. २००९ मध्ये ते चिंचवड विधानसभेचे आघाडीचे उमेदवार होते, तेव्हा राष्ट्रवादीच्या खेळीचे भोईर राजकीय बळी ठरले होते. आता वेगळ्या पद्धतीने तोच डाव सुरू असल्याचे सूचित करून भोईर यांनी  कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले, आम्ही आघाडी धर्म पाळतो. गेल्या २५ वर्षांच्या राजकारणात कधी गद्दारी केली नाही. कारस्थानाला बळी होण्याचा खेळ आपल्याच बाबतीत सातत्याने झाला. आता नियतीने सूड घेतला आहे. आपल्यावर डाव टाकणाऱ्यांनाच आता कारस्थानाला सामोरे जावे लागते आहे. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की त्याच खड्डय़ात जावे लागते. कर्माची फळे भोगावी लागतात. आघाडी धर्म पाळा, असा आदेश असतानाही आपल्याला पाडण्यात आले. मात्र, दोषींवर कारवाई झालीच नाही. कारण, नेत्यांचा कार्यकर्त्यांवर अंकुश नव्हता. आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडीचा उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादीचे किती नगरसेवक त्याचे काम करतील, ते पाहून काँग्रेसला आपली भूमिका ठरवावी लागेल. राष्ट्रवादीचे नगरसेवकच विरोधकांचे काम करणार असतील तर आम्ही वाईटपणा का घ्यावा. १०० टक्के राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रचारात सहभागी होणार आहेत का, ते पाहून आम्ही आमचा सहभाग ठरवू.

मोदींना पाठिंबा देण्यापेक्षा घरी बसू!

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला आम्ही पाठबळ देण्याचे काही कारण नाही. त्यापेक्षा घरी बसणे पसंत करू. राष्ट्रवादीने कुणाला उमेदवारी द्यावी आणि दिली, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही ‘पाडापाडी’ चे राजकारण करत नाही, ते पाप आम्हाला करायचे नाही. सहा महिन्यात विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे, त्यामुळे इतर पक्षांचे काम करून भविष्यातील नुकसान करण्याचा पक्षाच्या दृष्टीने घातकी खेळ आम्ही खेळणार नाही, असे भोईर यांनी म्हटले आहे.