यु-ट्युबवरुन दुचाकी चोरीचे धडे घेऊन अवघ्या २५ सेकंदात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या चोराला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या प्रकारात अल्पवयीन मुलगाच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. तो सध्या १२ वी मध्ये शिकत असून त्याच्या नावावर घरफोडीसह, दुचाकी चोरीचे १४ गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. अल्पवीयन आरोपीसह पोलिसांनी अजित साबळे या आरोपीलाही अटक केली असून दोघांच्या ताब्यातून १८ महागड्या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

दोन्ही आरोपींनी यु-ट्यूबवर बाईक चोरी करण्याचे व्हिडीओ पाहत चोरी करायला सुरुवात केल्याची माहिती तपासाअंती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेला अल्पवयीन मुलगा इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे. आरोपी अगोदर मायानगरी मुंबईत शिक्षण घेत होता. मात्र, तिथेही चोऱ्या करत असल्याचं त्याच्या आईच्या लक्षात आलं आणि तिने पुण्यात नातेवाईकांच्या ओळखीने स्थानिक महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवलं.

अल्पवयीन आरोपी यातून सुधारला नाही. त्याने गावाकडील आपल्या मित्राला बोलवून घेत यु-ट्यूबवरुन बाईक चोरीचे व्हिडीओ दाखव त्याला चोरीचं प्रशिक्षण दिलं. दोघेही आरोपी सुमारे २५ ते ३० सेकंदात सिंगल लॉक असलेली बाईक चोरी करायचे. दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पुणे शहर, ग्रामीण, अहमदनगर, नाशिक पिंपरी-चिंचवड परिसरातून १८ दुचाक्या चोरल्याचे समोर आलंय. पहाटेच्या सुमारास परिसरात फिरून महागडी दुचाकी दिसताच काही सेकंदात चोरून ती गावाकडे कमी किमतीत विकायची असा सपाटा आरोपींनी लावला होता. मात्र, भोसरी पोलिसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी प्रकरणाचा तपास केला. सदर ची कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या पथकाने केली आहे.