पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १०१ किलो गांजा भोसरी पोलिसांनी पकडलेला आहे. ज्याची किंमत १६ लाख रुपयांच्या घरात आहे. दोन्ही आरोपी हे मित्र असून ते भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावर हा गांजा इतर व्यक्तींना देण्यासाठी आले होते. तेव्हा, भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसरा फरार झाला आहे. त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.

अतिक युनिस शेख वय-२७ अस अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे. तर रफिक शेख अस फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हे मित्र असून अहमदनगर जिल्यातील रहिवासी आहेत. ते दोघे भोसरी मधील व्यक्तीला गांजा पोहचविण्यासाठी आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना त्या अगोदरच अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी लगत गांजा विक्रीसाठी अज्ञात व्यक्ती येणार असल्याची गुप्त माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांची टीम त्या ठिकाणी गेली. तेव्हा, चारचाकी गाडीतून दोन व्यक्ती दोन गोणी मधून गांजा खाली घेत असल्याचे पोलिसांना दिसले. परंतु, त्या मधील चालक आरोपी मित्र रफिक हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला आहे. अतिक याच्याकडील दोन गोणीत तब्बल १०१ किलो गांजा मिळाला असून त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा गांजा भोसरी परिसरातही विकायला आला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचा तपास भोसरी पोलीस करत आहेत. हा गांजा कामगार वर्ग, आणि झोपडपट्टी परिसरात वितरित केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधीत दोन्ही आरोपींना भागीदारीतून पैसे मिळत असावेत असा देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. संबंधित घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.