पत्रकारितेमधील असोत किंवा भूपेन हजारिका यांच्या गीतातील असोत, शब्द हे तलवारीसारखे असतात, अशी भावना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केली. ईशान्येकडील राज्यांची दु:खे वेगळी आहेत. त्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये जोडण्याचे काम समुद्र गुप्त कश्यप यांच्या पत्रकारितेने केले आहे, अशा शब्दांत त्यांनी कश्यप यांचा गौरव केला.
सरहद संस्थेतर्फे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या गुवाहाटी आवृत्तीचे सहसंपादक समुद्र गुप्त कश्यप यांना शिंदे यांच्या हस्ते भूपेन हजारिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध दिग्दर्शक जाहनू बरुआ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, तपती कश्यप आणि संजय नहार या वेळी उपस्थित होते.
एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये बोलणी सुरू असताना या पुरस्काराच्या माध्यमातून ‘सरहद’ आपल्याच देशातील प्रांतांना जोडू पाहत आहे, असे सांगून शिंदे म्हणाले,‘काँग्रेसचा सरचिटणीस असताना १९९२ ते १९९६ या कालावधीत आसामच्या दऱ्याखोऱ्यात फिरलो आहे. गृहमंत्री म्हणून डोग्री भागातील दहशतवादी हल्ले रोखण्यामध्ये यश आले. केंद्र सरकारने नागालँडमधील एका गटाशी बोलणी केली आहेत. मात्र, खरा गट अजून वेगळाच आहे. सामाजीकरण आणि आर्थिक नीती राबवून ईशान्येकडील राज्यांतील गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होता कामा नये यासाठी कश्यप सदैव जागरुक असतात. सत्याची कास धरून स्वाभिमानी भूमिकेतून ते पत्रकारिता करीत आहेत.’
‘एफटीआयआय’मध्ये शिक्षण घेत असताना सत्तरीच्या दशकातील पुण्याच्या स्मृती अजून ताज्या आहेत. मोठय़ा भावाकडून मनीऑर्डरद्वारे पैसे येईपर्यंत तीन रात्री संभाजी उद्यानामध्ये काढल्या होत्या, या आठवणींना उजाळा देत जाहनू बरुआ म्हणाले,की कश्यप यांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडताना अभ्यासपूर्ण तरीही तटस्थतेने पत्रकारिता केली आहे.
वयाच्या सहाव्या वर्षी भूपेन हजारिका यांची भेट झाली होती. त्यांच्या ‘ब्रह्मपुत्र-एक अंतहीन यात्रा’ या मालिकेसाठी मला योगदान देता आले. मी ज्यांना आदर्श मानतो त्या भूपेनदांच्या नावाचा सन्मान मिळाल्याचा आनंद होत असल्याची भावना समुद्र गुप्त कश्यप यांनी व्यक्त केली.

देशहित ध्यानात घेऊनच
दाऊदचा प्रश्न सोडवावा
कुख्यात गुन्हेगार आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम पाकिस्तानामध्ये कोठे आहे, एवढेच नव्हे तर कोणत्या कॉलनीत राहतो याचे पुरावे जमा करून आपल्या गृहमंत्रीपदाच्या काळात पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना दिले होते. यासंदर्भात ‘रेड कॉर्नर नोटीस’देखील निघाली होती. आताच्या सरकारने पक्ष बाजूला ठेवून देशहिताला प्राधान्य देत आणखी पुरावे गोळा करून पाकिस्तानवर दबाब आणावा, अशी अपेक्षा सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ‘एफटीआयआय’ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भूमिकेचा विचार झाला पाहिजे. हुकूमशाही पद्धतीने कारभार करून चालणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.