17 December 2017

News Flash

भुसार बाजारात मंदीचे वातावरण

दिवाळीत तूर डाळ, चना डाळ, तेल, खोबरे या जिनसांचे भाव तेजीत असतात.

प्रतिनिधी, पुणे | Updated: October 12, 2017 4:20 AM

नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम; भाव उतरल्याने सामान्यांना दिलासा

दिवाळीत भुसार बाजारातील व्यवहार तेजीत असतात. दिवाळीत होणाऱ्या उलाढालीचे परिणाम भुसार बाजारातील अर्थकारणावर होतात. मात्र, नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भुसार बाजारातील अर्थकारणावर परिणाम झाला असून यंदाच्या दिवाळीत भुसारबाजारावर मंदीचे सावट आहे. गतवर्षीच्या तुलनेत दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या प्रमुख जिनसांचे भाव कमी झाले आहेत. फराळासाठी लागणाऱ्या जिनसांचे भाव उतरल्याने सामान्यांना दिलासा मिळाला असला तरी गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक भुसार बाजारात यंदाची दिवाळी मंदीची ठरली आहे.

दिवाळीत तूर डाळ, चना डाळ, तेल, खोबरे या जिनसांचे भाव तेजीत असतात. मात्र, यंदा खोबरे वगळता तूर डाळ, चना डाळ तसेच तेलाचे भाव उतरले आहेत. भाव उतरले असले तरी दिवाळीत मार्केटयार्डातील घाऊक बाजारात खरेदीदारांची फारशी गर्दी झाली नाही. नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना बसला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी कणा आहे. दिवाळीत शहरी भागातील ग्राहक तयार फराळ विकत घेतो. नोटाबंदीचे परिणाम कृषी व्यवसायावर झाले आहेत. त्यामुळे यंदा ग्रामीण भागातील खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे, असे निरीक्षण दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी नोंदविले.

बाजारआवारात फारशी उलाढाल झालेली नाही. त्यामुळे भुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्यादृष्टीने यंदाची दिवाळी मंदीची ठरली आहे. भुसार बाजारात खरेदीत ग्रामीण भागातील खरेदीदारांचा मोठा वाटा आहे. पुण्यातील भुसार बाजारातून कोल्हापूर, पुणे जिल्हा, कोकण भागात माल विक्रीसाठी पाठविला जातो, असे ओस्तवाल यांनी सांगितले.

सामान्यांना दिलासा

यंदा पाऊस चांगला झाल्याने चांगल्या पिकाची आशा आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या जिनसांचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे, असे दी पूना र्मचटस् चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितले.

बाजारात निरूत्साह

अन्नधान्य, मिरची, हळद, धने, चिंच या खाद्यान्नांवर जीएसटी लागू करण्यात आला. हा कायदा लागू होण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती. जीएसटी लागू झाल्यानंतर खाद्यान्नांचे भाव कमी होतील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र जीएसटीनंतर खाद्यान्नांचे भाव कमी झाले नाहीत. एकप्रकारे सरकारकडून झालेली ही फसवणूक आहे. दिवाळी ही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने फारशी आशादायी नाही, असे दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती म्हणाले.

First Published on October 12, 2017 4:20 am

Web Title: bhusar market gst