गेल्या २४ तासांपासून लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढल्यामुळे भुशी धरणाच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. धरण सध्या ओसंडून वाहत असून कोणताही धोका टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा आनंद लुटण्यास तसेच उंच ठिकाणी जाण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. पाणी कमी होईपर्यंत ही बंदी कायम राहाणार असल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरावर चढताना एक पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

गेल्या दोन दिवसांत पावसाने २२० मिलिमीटरचा आकडा पार केल्याने, धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्ठीकोनातून लोणावळा पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. भुशी धरणावर येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेकांच्या आनंदाला पारावर राहत नाही, यातून अनेकांचे जीव ही गेले आहेत. त्यातच शनिवार-रविवार सुट्टीचे दिवस असल्याने पोलिसांनी सकाळीच तातडीने हा निर्णय जाहीर केला. गेल्या आठवड्यात देखील लोणावळा पोलिसांनी पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यापासून असाच मज्जाव केला होता.

लोणावळा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहे. अशा वेळी पर्यटकांना पर्यटनस्थळांवर सोडणे धोकादायक आहे. याची दखल घेऊन लोणावळा पोलिसांनी भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसण्यास आणि धबधब्याच्या उंच ठिकाणही जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसण्याचा आनंद घेता येणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले.