पिंपरीतील जिजामाता प्रभागाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांना मदत करण्याच्या हेतूने प्रमुख राजकीय नेत्यांचे ‘फिक्सिंग’ झाल्याचे चित्र पुढे आले आहे.
गौतम चाबुकस्वार नगरसेवक असताना आमदार म्हणून निवडून आले. तत्पूर्वी, त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी १८ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. बुधवारी छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले. राष्ट्रवादीचे अरुण टांक, भाजप-रिपाइंचे अर्जुन कदम, शिवसेनेचे सुनील चाबुकस्वार, काँग्रेसचे संपत ओव्हाळ, मनसेचे राजू भालेराव हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
सुनील चाबुकस्वार आमदार गौतम चाबुकस्वारांचे बंधू आहेत. २०१२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तथापि, बंधूंच्या पाठोपाठ त्यांनीही पक्ष बदलला आहे. आता ते शिवसेनेच्या तिकिटावर भवितव्य आजमावत आहेत. आतापर्यंत पडद्यामागून सर्व यंत्रणा सांभाळणाऱ्या भावाला निवडून आणण्यासाठी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून माजी नगरसेवक राजेश पिल्ले तीव्र इच्छुक होते. अन्य नावांचीही चाचपणी झाली. मात्र, नाटय़मय घडामोडीनंतर भाजपने ही जागा रिपाइंसाठी सोडली. राज्यात भाजप-सेनेचे सरकार असल्याने शिवसेनेच्या आमदारांशी होणारा संभाव्य संघर्ष भाजपने टाळला. चाबुकस्वार हे मूळचे काँग्रेसचे होते. त्यांचे सर्व पक्षात हितचिंतक आहेत. आमदार म्हणून निवडून येण्यासाठी त्यांना या संबंधांचा भरपूर उपयोग झाला होता. त्यामुळेच पोटनिवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने स्थानिक नेत्यांमध्ये
‘फिक्सिंग’ झाले आहे.