News Flash

ब्रॅण्ड पुणे : पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या सायकलींचे संग्रहालय

सायकलींचे शहर ही पुण्याची जुनी ओळख आता बदलून दुचाकी गाडय़ांचे शहर अशी झाली आहे.

उच्चभ्रू व्यक्तींकडून वापरली जाणारी तीन चाकी सायकल

 

रस्त्यांवरील दुचाकी गाडय़ांमध्ये दिसेनाशा झालेल्या सायकलींचे एक खास संग्रहालय पुण्यात आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?.. विक्रम पेंडसे या सायकलवेडय़ाने हे संग्रहालय उभारले आहे, तर पांडुरंग गायकवाड हे निगुतीने या संग्रहालयाची देखभाल करतात. हे तीन मजल्यांचे संग्रहालय पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेच, शिवाय विशिष्ट प्रकारच्या वस्तूंच्या संग्रहालयांमध्ये पुण्याला एक ओळख मिळवून देत आहे.

सायकलींचे शहर ही पुण्याची जुनी ओळख आता बदलून दुचाकी गाडय़ांचे शहर अशी झाली आहे. असे असले तरी ‘पुण्याची बेशिस्त वाहतूक सुधारली तर मी सायकल नक्की वापरेन,’ असे म्हणून हळहळणारा पुणेकर विरळा नाही. प्रत्येकाच्या शालेय जीवनाचा आणि अनेक ज्येष्ठांच्या महाविद्यालयीन व त्या पुढीलही जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या सायकलीने या शहराच्या मनाच्या कोपऱ्यात एक खास जिव्हाळ्याचे स्थान मिळवले आहे. सायकलींच्या या जुन्या सुखद आठवणी जागे करणारे एक नितांत सुंदर संग्रहालय पुण्यात कर्वेनगर येथे उभारण्यात आले आहे. विक्रम पेंडसे यांच्या राहत्या घरात उभारले गेलेले हे तीन मजली संग्रहालय जिज्ञासू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे.

पेंडसे हे खरे तर वाणिज्य शाखेचे पदवीधर. पण मोटरसायकली हे त्यांचं पहिलं प्रेम. आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवून विक्रम यांनी १९९० मध्ये गॅरेजमध्ये मोटारसायकली व स्कूटर दुरुस्ती करू लागले. तिथे वेगवेगळ्या गाडय़ा त्यांना बघायला मिळत. तेव्हाच मोटारसायकली आणि स्कूटर आपण जमवाव्यात हे त्यांच्या मनाने घेतले. तशा ५-६ मोटारसायकली आणि स्कूटर त्यांनी जमवल्या देखील. त्यानंतर १९९६ मध्ये वडिलांच्या मित्राने विक्रम यांना एक दुमडणारी सायकल भेट दिली. ‘बीएसए पॅरॅट्रपर्स’ नावाची ही सायकल मोठी वैशिष्टय़पूर्ण होती. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांनी या सायकली वापरल्या होत्या. दुमडलेली सायकल पाठीवर बांधून हे सैनिक पॅरॅशूटच्या साहाय्याने विमानांमधून उडी मारत. खाली उतरल्यावर जिथे सपाट जागा मिळेल तिथे सायकल चालवायला सुरुवात! दुर्मीळ असलेल्या त्या सायकलीने विक्रम यांच्या मनात जुन्या सायकलींबद्दल खूप कुतूहल निर्माण केले. त्या वेळी विक्रम यांच्या पाहण्यात सायकलींचा संग्रह कुणी करत नव्हते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास जागा पटकावणाऱ्या सायकलींचा आपण संग्रह करावा, असे त्यांच्या मनात आले. आता त्यांच्या संग्रहात जुन्या व वैशिष्टय़पूर्ण अशा दोनशे सायकली आहेत. सायकली आणि त्यांचे सुटे भाग मिळवण्यासाठी भटकंती करताना अनेकदा इतरही काही जुन्या व दुर्मीळ वस्तू त्यांना दिसत. इस्त्री, बाटल्या, अ‍ॅश ट्रे, सिगारेट लायटर्स, जुने दिवे, कंदील, घरगुती वस्तू अशा अनेक वस्तूंचा संग्रह त्यांच्याकडे झाला. परंतु त्यांना प्रमुख आकर्षण सायकलींचेच राहिले.

जुन्या वस्तूंचा संग्रह म्हटला की खर्च आलाच. परंतु एखादी दुर्मीळ वस्तू पाहिली की विक्रम यांना ती घ्यावीशी वाटतेच. पूर्वी जुन्या सायकलीही तुलनेने स्वस्त होत्या. आता त्यांची किंमत बरीच वाढली आहे. पेंडसे यांचे दुचाकींचे गॅरेज आहे. तो व्यवसाय सांभाळून ते या छंदासाठी वेळ देतात. त्यांचे कुटुंबीयही या छंदात समरसून गेले आहेत. जुन्या सायकलींची आणि इतर वस्तूंचीही कायम देखभाल करणे हे देखील मोठे काम आहे. हे काम पांडुरंग गायकवाड करतात. गायकवाड हे स्वत: सायकलींविषयी जिव्हाळा असणारे आणि अनेक सायकल स्पर्धामध्येही भाग घेतलेले. गेली दहा वर्षे ते पूर्ण वेळ संग्रहातील प्रत्येक वस्तूची निगा राखण्याची जबाबदारी सांभाळत आहेत. पाच वर्षांपूर्वी पेंडसे यांनी आपल्या सायकलींचे प्रदर्शन भरवले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राहत्या घरातच सायकलींचे कायमस्वरूपी संग्रहालय करायचे त्यांनी ठरवले आणि हे अत्यंत सुंदर असे तीन मजली संग्रहालय उभे राहिले. हे संग्रहालय नवे असले तरी पुण्याबाहेरून आणि बाहेरील राज्यांमधील पर्यटकही येथे येऊ लागले आहेत. आणखी पर्यटकांपर्यंत ते पोहोचावे यासाठी संग्रहालयाचे संकेतस्थळ तयार करण्याचे काम सुरू आहे.

संग्रहालयात विशेष पाहण्यासारखे काय?

  • जुन्या दोन चाकी व तीन चाकी सायकली
  • लहान मुलांच्या जुन्या सायकली
  • दुमडणाऱ्या सायकली
  • सायकलींवर बसवण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे
  • सायकल व मोटारींचे वैशिष्टय़पूर्ण भोंगे
  • जुनी बाबागाडी, बग्गी
  • जुन्या घरगुती वस्तू, इतरही दुर्मीळ वस्तू

sampada.sovani@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 4:41 am

Web Title: bicycle museum in pune
Next Stories
1 गाणं आलं तरच व्हायोलिनमधून प्रकटते!
2 ‘स्वाभिमानी’च्या सदाभाऊंचं काय करायचं?, ४ जणांची समिती करणार फैसला
3 पुण्यात एसटी-टेम्पोचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
Just Now!
X