पुण्यातील धायरी परिसरातील एका इमारतीच्या आवारात झालेल्या स्फोटाचे गूढ अखेर उकलले आहे. हा स्फोट फटाक्यांचा होता, हे स्पष्ट झाले असून इमारतीत राहणाऱ्या तरुणीने प्रेमसंबंध तोडल्याने संतापलेल्या प्रियकराने हा स्फोट घडवला होता.

बुधवारी पहाटे धायरीतील आलोक पार्क सोसायटीजवळ स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक घाबरले होते. तसेच या स्फोटामुळे इमारतीतील एका घरातील खिडकीची काच देखील फुटली. या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक दुचाकी संशयास्पदरित्या फिरताना आढळली. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. किशोर मोडक (वय २०) आणि अक्षय सोमवंशी (वय २४) अशी या तरुणांची नावे आहेत.

यातील किशोर मोडक या तरुणाची मावशी धायरीत राहते. यामुळे किशोरची या परिसरात ये- जा असायची. यादरम्यान त्याची एका तरुणीशी ओळख झाली. काही दिवसांनी ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, दोन वर्षांनी तरुणीने मोडकशी संबंध तोडले. त्या तरुणीला धडा शिकवण्यासाठी मोडकने तिच्या घरासमोर स्फोट घडवण्याचे ठरवले.
मोडकने त्याचा मित्र सूर्यवंशीच्या मदतीने फटाक्यांची दारू छोट्या खोक्यात टाकली. त्यासोबतच बॉल बेअरिंगचे तुकडेही खोक्यात टाकले. बुधवारी पहाटे त्यांनी तरुणीच्या इमारतीबाहेर हा स्फोट घडवला.