सिनेसृष्टीचा शहेनशा अशी ओळख असणारे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा लोणावळ्याच्या सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. या पुतळ्याचे अद्याप अनावरण झाले नसले, तरी तो प्रेक्षकांना पाहण्यासाठी आता खुला करण्यात आला आहे. हा पुतळा  साकारणारे कलाकार सुनील कंडलूर यांनी ही माहिती दिली.
लोणावळा शहरापासून चार किमी अंतरावर पुण्याच्या दिशेला वरसोली गावात सुनील कंडलूर यांचे सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम सन २०१० पासून कलेचा आनंद रसिकांना देत आहे. या म्युझियममध्ये गेल्या आठ महिन्यांपासून अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा बनविण्याचे काम सुरू होते. अमिताभ बच्चन यांचा हा पूर्णाकृती मेणाचा पुतळा त्यांच्या छायाचित्रावरून बनवण्यात आला आहे. हा पुतळा बनविणे तसे आव्हानात्मक काम होते, मात्र हा पुतळा तयार झाल्यानंतर त्यातील जिवंतपणा पाहून आपण वास्तवातील ‘बिग बी’ समोर उभे असल्याचा भास प्रेक्षकांना होईल, असा विश्वास कंडलूर यांनी व्यक्त केला.
लोणावळ्याजवळील वरसोली या गावात कंडलूर यांनी लंडन येथील मादाम तुसॉ संग्रहालयाच्या धर्तीवर भारतातील पहिले मेणपुतळ्यांचे संग्रालय सुरू केले आहे. या संग्रहालयात आतापर्यंत पन्नासहून अधिक पुतळे साकारण्यात आले असून राजकीय नेते, अभिनेते यांचा समावेश त्यात आहे. येत्या दोन महिन्यात संग्रहालयात रजनीकांत, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, मुकेश खन्ना, सोनु सुद, श्रेया शरण यांचे पुतळे दाखल होणार असल्याचेही कंडलूर यांनी सांगितले.