08 March 2021

News Flash

उद्योगनगरीपुढे मोठी आव्हाने

सध्या औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न गंभीर आहेत. विविध तंटे आहेत.

|| बाळासाहेब जवळकर

पिंपरी : औद्योगिक क्षेत्र म्हणून पिंपरी-चिंचवडची श्रमिकांची नगरी उदयास आली, तेव्हापासूनच्या ६० वर्षांच्या वाटचालीत शहराने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जात असलेल्या उद्योगनगरीपुढे औद्योगिक मंदी, उद्योगांना पोषक धोरणांचा अभाव, कंत्राटीकरण, सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष, बेकायदा माथाडी संघटनांचा त्रास, खंडणीखोरी अशी मोठी आव्हाने आहेत.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० मध्ये झाली. त्यानंतर, १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) स्थापना झाली. पुणे-मुंबईपासून जवळ आणि वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने पिंपरी-चिंचवडला एमआयडीसी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. तत्पूवी, १९५४ मध्ये पिंपरी  त हिंदूस्तान अँटीबायोटिक्स (एचए) कंपनीची स्थापना झालेली होती. १९५१ मध्ये दापोडीत एस.टी. कार्यशाळाही सुरू झाली होती. त्याच्या बऱ्याच आधी खडकीत दारूगोळा कारखाना तसेच किलरेस्कर ऑइल इंजिन कंपनी सुरू झाली होती, त्यात शहरातील कामगार मोठय़ा संख्येने होते. एच.ए कंपनी स्थिरसावर झाल्यानंतर रस्टन ग्रीव्हज, टाटा मोटर्स, बजाज, अ‍ॅटलास कॉप्को, सेंच्युरिएन्का, मिहद्रा, सँडव्हिक एशिया, फिलिप्स आदी मोठय़ा कंपन्या उभ्या राहू लागल्या. अशा कंपन्यांना आवश्यक कच्चा माल, सुटय़ा     भागांसाठी छोटे-मोठे व्यवसाय सुरू होऊ लागले.

कारखानदारी वाढू लागली, कामगारांची गरज भासू लागली. राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती होती, तेथील नागरिक पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवडला येऊ लागले. त्यांना कामही मिळत गेले. कामगारांचा राबता वाढत राहिला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येत कामगारांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होऊ लागला. बैठी घरे, चाळी उभ्या राहू लागल्या. तरी कामगारांची निवासाची व्यवस्था कामाच्या ठिकाणी जवळच व्हावी, असा हेतू ठेवून प्राधिकरणाची स्थापना झाली. औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती वाढू लागली, तसतसे शहराची ओळख कामगारनगरी, औद्योगिकनगरी बनली.

सध्या औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न गंभीर आहेत. विविध तंटे आहेत. त्यावरून असणारी अस्वस्थता विविध आंदोलनांच्या निमित्ताने वेळोवेळी व्यक्त झाली आहे. अशा प्रश्नांकडे लक्ष देऊन त्याची वेळीच सोडवणूक न झाल्यास उद्योगनगरीचे भवितव्य अंधारमय असेल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येते.

यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी -चिंचवडची औद्योगिकदृष्टय़ा पायाभरणी झाली. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही शहराची उद्योगनगरी ही ओळख टिकून आहे. शहरात सर्वप्रकारचे १० लाख कामगार असतील. आठ हजारांहून अधिक उद्योजक आहेत. वाहनउद्योग क्षेत्राचे मोठे केंद्र म्हणून पिंपरी -चिंचवडची ओळख आहे. सध्याचे उद्योगांपुढील प्रश्न गंभीर असून ते कायम राहिल्यास मोठय़ा कंपन्यांना उत्पादने बंद करावी लागतील आणि सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाची पीछेहाट होईल. – अ‍ॅड. अप्पासाहेब शिंदे,

अध्यक्ष, पिंपरी -चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज

 

अण्णासाहेब मगर यांच्यामुळे शहराला औद्योगिक चेहरा मिळाला, कामगार वर्ग स्थिरावला. टाटा मोटर्सच्या लढय़ाने कामगार चळवळ ढवळून निघाली. कामगार नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा आणि अनास्थेमुळे कामगार मूळ चळवळीपासून दूर गेला. अलीकडे तर कामगार क्षेत्रात धंदेवाईकता शिरल्याने कामगार एकाकी पडल्याचे चित्र दिसते. – अरुण बोऱ्हाडे, कामगार नेता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:07 am

Web Title: big challenges ahead of the industrial city akp 94
Next Stories
1 इमारतींच्या भिंतींकडून आता सौर ऊर्जेची निर्मिती
2 शेजाऱ्यांकडे चावी ठेवणं महागात पडलं; CCTV मुळे धक्कादायक सत्य समोर आलं
3 दिल्ली हिंसाचार : मोदी सरकारवर संतापले अमोल कोल्हे
Just Now!
X