03 March 2021

News Flash

उद्योगनगरीत दिवाळी बोनसबाबत संमिश्र स्थिती

मोठय़ा कंपन्या सकारात्मक, इतर ठिकाणी बैठकांचे सत्र सुरूच

मोठय़ा कंपन्या सकारात्मक, इतर ठिकाणी बैठकांचे सत्र सुरूच

पिंपरी: औद्योगिक मंदीमुळे खचलेल्या आणि करोनामुळे कोलमडून पडलेल्या उद्योगनगरीतील कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस मिळणार का, याविषयीचे संमिश्र चित्र आहे. मोठय़ा कंपन्या बोनससाठी सकारात्मक आहेत. इतर कंपन्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. जिथे पगाराचेच काही खरे नाही, तिथे कामगारांच्या स्वप्नातही बोनस नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचवेळी, कष्टकरी आणि असंघटित कामगारांची दिवाळी मात्र अंधारात राहण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसून येते.

दिवाळीनिमित्त कामगारांना दिल्या जाणाऱ्या बोनसवरून दरवर्षी समाधान आणि असंतोष असे वातावरण उद्योगनगरीत असते. यंदा करोनामुळे सगळीच परिस्थिती बदलली आहे. मार्च महिन्यापासून आलेले करोनाचे संकट अद्यापही टिकून आहे. करोनामुळे कंपन्यांचे अर्थकारण कोलमडून पडले, उत्पादन बंद पडले आणि उत्पन्नाचे मार्गही खुंटले. त्यामुळे अनेक ठिकाणी कामगारांमध्ये कपात, कर्मचाऱ्यांची वेतनकपात असे कटू निर्णय घेण्यात आले. अशा प्रतिकूल वातावरणातही टाटा मोटर्सने आपल्या कामगारांना यंदा ३५ हजारांचा बोनस जाहीर केला. त्यापाठोपाठ, चाकणच्या बेंटलर ऑटोमोटिव्ह इंडियाने २४ हजारांचा बोनस जाहीर केला. िपपरी पालिकेच्या साडेआठ हजार कामगारांना दरवर्षीप्रमाणेच बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याशिवाय, काही मोठय़ा कंपन्यांमध्ये बोनसविषयी चर्चा सुरू आहेत. अद्याप अधिकृत घोषणा झालेल्या नाहीत. इतर छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांनी अद्याप भूमिका

स्पष्ट केली नाही. औद्योगिक तंटे असणाऱ्या कंपन्यांमध्ये संघर्षांची परिस्थिती कायम आहे. कष्टकरी, असंघटित, कंत्राटी कामगारांना पुरेसा पगार नाहीच, बोनसही मिळणार नाही. त्यामुळे त्यांना दिवाळीसाठी आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांच्या संघटनांकडून होत आहे.

पिंपरी महापालिकेच्या कामगारांना सालाबादप्रमाणे ८.३३ टक्के बोनस आणि १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्याचा लाभ पालिकेच्या ८५०० कायम कामगारांना होणार आहे.

– अंबर चिंचवडे, अध्यक्ष, पिंपरी पालिका कर्मचारी महासंघ.

मोठय़ा कंपन्यांकडून बोनस मिळेल. छोटय़ा कंपन्यांचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. कायद्यानुसार कामगारांना बोनस दिला पाहिजे. कंपनीस्तरावर चर्चा, बैठका सुरू आहेत. जिथे अडचणी असतील, तिथे चर्चेतून मार्ग निघू शकतो.

– दिलीप पवार, अध्यक्ष, श्रमिक एकता महासंघ

रिक्षाचालक, धुणीभांडी कामगार, मोलकरणी, महिला सफाई कामगार आदींची यंदाची दिवाळी अडचणींची आहे. कायम कामगारांना बोनस दिला जाणार असून कंत्राटी कामगारांचा विचार झालेला दिसत नाही.

– बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी पंचायत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:59 am

Web Title: big companies positive regarding diwali bonus in pimpri zws 70
Next Stories
1 राज्याच्या निम्म्याहून अधिक भागांतून पाऊस माघारी
2 कांदा दर घटण्याची शक्यता
3 दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत अनिश्चितता
Just Now!
X