किरकोळ विक्रेत्यांकडून गुलाबांना मोठी मागणी

महाशिवरात्र आणि व्हॅलेन्टाइन डे निमित्त घाऊक फूल बाजारात मंगळवारी गुलाबपुष्पांची मोठी आवक झाली. किरकोळ विक्रेत्यांकडून गुलाब गड्डीला मोठी मागणी राहिली. मार्केट यार्डातील फूल बाजारात साडेअकरा हजार गुलाब गड्डींची आवक झाली.

मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात मावळ तालुक्यातून गुलाब गड्डय़ांची आवक झाली. व्हेलेन्टाइन डे  बुधवारी आहे. तरुणाईकडून लाल गुलाबाला विशेष मागणी असते. घाऊक बाजारात डच गुलाबाच्या गड्डीचे दर (२० गुलाब) १०० ते १६० रुपये असे होते, असे फूल बाजारातील प्रमुख विक्रेते सागर भोसले यांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त पांढरी बिजली, गुलछडीला चांगली मागणी राहिली. घाऊक बाजारात गुलछडीची १२० ते १७० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री करण्यात आली. पांढऱ्या बिजलीचा प्रतिकिलोचे दर १० ते ४० रुपये दरम्यान होता, असे भोसले यांनी  सांगितले.

घाऊक फूल बाजारात मुळशी, मावळ, हवेली तालुक्यातून ११ हजार ४७१ गुलाब गड्डीची आवक झाली. महाशिवरात्रीनिमित्त ३६ हजार २४३ किलो बिजली,  ३४ हजार ४८० किलो झेंडू, २ हजार ६६५ किलो गुलछडी अशी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजार विभागाचे प्रमुख मंगेश पठारे यांनी दिली.

छापील गुलाबांनाही मागणी

व्हॅलेन्टाइन डेनिमित्त खास प्रिंटेड  गुलाब तयार करण्यात आले आहेत. लाल रंगाच्या गुलाबावर चित्र  किंवा संदेश उमटून त्याची विक्री केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून व्हॅलेन्टाइन डेनिमित्त आम्ही खास प्रिंटेड गुलाबाची निर्मिती करीत आहोत, असे सिराज बुटीकच्या हर्षां लुणावत आणि अनुजा शिंगाडे यांनी सांगितले. गुलाबावर चित्र छापून हवे असेल तर त्यासाठी छायाचित्र ऑनलाइन पाठवावे लागते. छायाचित्र असलेल्या एका गुलाबाची किंमत पन्नास रुपये आहे, तर संदेश असलेल्या गुलाबाची किंमत तीस रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.